Headlines

पुणे ग्रँड टूरपूर्वी निकृष्ट कामांसाठी कंत्राटदारांसह अभियंत्यांवर कारवाई:रस्ते, पदपथ आणि 75 किमी सायकल मार्गांचे जाळे उभारणार; आयुक्तांचे निर्देश




पुणे ग्रँड टूर २०२७ च्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते, पदपथ, चौक आणि सायकल मार्गांच्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे. रस्त्यांवरील युटिलिटी चरांचे निकृष्ट पुनर्भरण आणि मॅनहोलच्या चुकीच्या समपातळीकरणामुळे वारंवार रस्ते खराब होत असल्याने, अशा कामांमध्ये दोष आढळल्यास संबंधित कंत्राटदारांसह देखरेख करणाऱ्या महापालिका अभियंत्यांचीही जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सोमवारी (दि. १९) झालेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले. ग्रँड टूरच्या सुमारे ४.५ किलोमीटर मार्गावरील मध्य दुभाजकांची दुरुस्ती व उर्वरित कामे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत, तर बाणेर रस्ता आणि गणेशखिंड रस्त्यावरील कामे ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची मुदत टाटा प्रोजेक्ट्सला देण्यात आली आहे. संचेती रुग्णालय ते बालेवाडी मार्गावरील बांधकामाचा राडारोडा, अतिरिक्त साहित्य आणि पदपथांवरील अडथळे हटविण्यासाठी महापालिका व टाटा प्रोजेक्ट्स संयुक्त स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. कामे पूर्ण झालेल्या ठिकाणचे सुरक्षा कठडे आणि फलक एका आठवड्यात हटविण्याचे निर्देशही देण्यात आले. चरांच्या कामांची तपासणी होणार युटिलिटी चरांचे पुनर्भरण आणि मॅनहोलच्या कामांसाठी प्रमाणित कार्यपद्धतीची (एसओपी) काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी केलेल्या आणि त्यानंतर खराब झालेल्या कामांची ठिकाणनिहाय तपासणी करून अहवाल सादर करावा, तसेच अभियंते, पर्यवेक्षक आणि कंत्राटदारांना नियमित तांत्रिक प्रशिक्षण द्यावे, असेही निर्देश आहेत. ७५ किमी सायकल मार्गांचे उद्दिष्ट शहरात ७५ किलोमीटर लांबीचे सलग, सुरक्षित सायकल मार्ग विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अस्तित्वातील मार्गांमधील तुटक जोडणी दूर करून पादचारी सुविधा, चौक सुधारणा आणि सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. ही कामे केवळ स्पर्धेपुरती न राहता पुणेकरांना दीर्घकाळ उपयोगी पडावीत, असा महापालिकेचा प्रयत्न आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *