![]()
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भाजपच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. पत्रकार परिषद घेत कदम यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावरून व व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून भाजपवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. प्रवीण दरेकर यांच्यानंतर आता आमदार प्रसाद लाड यांनी देखील रामदास कदम यांच्या टीकेवर जोरदार पलटवार केला आहे. पत्रकार परिषद घेत प्रसाद लाड म्हणाले, रामदास कदम जे बोलतायत त्याचं मी खंडन करतो आणि ज्या पद्धतीत त्यांनी सांगितलं आणि माझा काही फोटो त्यांनी मीडियाला दाखवला. मी देखील तुम्हाला फोटो दाखवतो. माझं तर रामदास कदम साहेबांना आव्हान आहे, एक फोटो कशाला दाखवता? आम्ही छाती उघडी ठेवून आंतरवाली सराटीला जातो. आम्ही पण मराठ्याची औलाद आहोत, आम्ही पळकुटे नाही आहोत रामदास भाई. माझा एक फोटो नाही मीडियाकडे, माझे 500 फोटो आहेत. मी ज्या ज्या वेळेला मनोज जरांगे पाटलांना भेटलो, त्या त्या वेळेला मीडियाच्या समोर ‘इन कॅमेरा’ भेटलेलो आहे. त्यामुळे रामदास कदम, हा सगळा फालतू धंदा बंद करा तुम्ही. आणि ज्या पद्धतीमध्ये संजय राऊत उबाठा शिवसेना डुबवायला निघालेत, तशी तुम्ही ही खरी शिवसेना डुबवायला जाऊ नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे. जो फोटो तुम्ही दाखवला तो एडिट करून दाखवला पुढे बोलताना प्रसाद लाड म्हणाले, तुम्हाला फोटोच पाहायचा असेल, जो फोटो तुम्ही दाखवला तो एडिट करून दाखवला, मी तुम्हाला मूळ फोटो दाखवतो. या फोटोमध्ये माननीय विखे पाटील साहेब, माननीय उदय सामंत साहेब, माननीय शंभूराजे देसाई साहेब आणि मी आहे. मग याच्यामध्ये प्रसाद लाडने वेगळी बैठक कुठे केली? मी तुम्हाला या माध्यमातून माननीय मंत्री उदय सामंत साहेबांना विचारायला लावतो… उदय सामंत साहेबांना विचारायचं की एकदाही त्यांना सोडून मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे का? असा प्रश्न लाड यांनी उपस्थित केला आहे. आम्हाला देखील आमच्या पद्धतीत उत्तर देता येतं अशा प्रकारे स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी, स्वतः काहीतरी फार मोठं करतोय हे दाखवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला जर रामदास कदम भाई बदनाम करणार असतील, तर रामदास कदम साहेबांना मी सांगतो, आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरलो असं नाही, ते दिवस आता गेले. तुम्ही ज्येष्ठ नागरिक झाला आहात, ज्येष्ठ नागरिकाच्या मानात राहा, नाहीतर आम्हाला देखील आमच्या पद्धतीत उत्तर देता येतं, असा इशारा प्रसाद लाड यांनी रामदास कदम यांना दिला आहे. ‘रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेशी चर्चा केली नसावी’ प्रसाद लाड म्हणाले, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या मध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम तुम्ही करू नका. मी मगाशी अनेक मीडियाला ऑडिओच्या माध्यमातून माझा इंटरव्ह्यू दिला. त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं की ही जी मुलाखत रामदास कदमांनी दिली आहे, ती रामदास कदम साहेबांनी एकनाथ शिंदेशी किंवा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दिलेली नाहीये. त्यांनी प्रथमतः या विषयामध्ये माहिती घ्यायला हवी होती. त्यांचे जे नेते, मग ते शंभूराजे देसाई असतील किंवा सन्माननीय उदय सामंत साहेब असतील, जे या सगळ्या प्रक्रियेत होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली नसावी, एकनाथ शिंदेशी चर्चा केली नसावी. स्वतःचा फायदा घेण्यासाठी, स्वतः काहीतरी मोठं करतायत हे दाखवण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. मी रामदास कदम साहेबांचा निषेध करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती करतो की एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही आमचे महायुतीचे नेते आहात आणि तुम्ही नेते म्हणून आम्ही सर्वांनी ते मान्य केलेलं आहे. आणि मागच्या या संपूर्ण आंदोलन काळात काय काय झालं, कोणी काय काय केलं, हे चित्रपटाप्रमाणे जनतेसमोर आणण्याची गरज नाही, असे लाड यांनी म्हटले आहे. जरांगेंनी फडणवीस साहेबांवर टीका केली तेव्हा तुम्ही कुठे गेला होतात? माझी रामदास कदमांना अजून एक आव्हान आहे. २०२३-२४ सालामध्ये ज्यावेळेला याच मनोज जरांगे पाटलांनी माननीय देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली, त्यावेळेला हे रामदास कदम तुम्ही कुठे गेला होतात? का तुम्ही केसाने गळा कापणार होतात देवेंद्र फडणवीसांचा? असा सवाल प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. त्यावेळेला हा प्रसाद लाड उभा राहिला आणि या प्रसाद लाडने मनोज जरांगेला अंगावर घेण्याचं काम केलं, या प्रवीण दरेकरांनी अंगावर घेण्याचं काम केलं, आशिष शेलारांनी अंगावर घेण्याचं काम केलं. त्यामुळे रामदास भाई, आमचं कर्तव्य काय आणि महायुतीचं कर्तव्य काय हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. ‘तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काय बोलता, याची ऑडिओ क्लिप उघड केली तर..’ प्रसाद लाड म्हणाले, तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून शिंदे साहेब तुमचा सन्मान करतायत, पण मागून या शिंदे साहेबांबद्दल आणि शिंदे साहेबांच्या मुलाबद्दल तुम्ही काय बोलता, याच्या जर ऑडिओ क्लिप आम्ही उघड केल्या तर तुम्हाला तुमची जागा निश्चितपणे कळेल हे मी तुम्हाला सांगतो. आणि शिंदे साहेब, मला या गोष्टीचं तुमच्याकडून एक कार्यकर्ता म्हणून उत्तर हवंय. आम्ही प्रामाणिकपणे या आंदोलनामध्ये एक मध्यस्थाची भूमिका केली. प्रत्येक वेळेला आंदोलन मागे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. विखे पाटील साहेब असतील, मी असेल, उदय सामंत साहेब असतील, शंभूराजे देसाई असतील, दादा भुसे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मकरंद आबा असतील… आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून या आंदोलनामध्ये मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केले. रामदास कदमांचे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही परंतु अशा पद्धतीमध्ये जर रामदास कदम भारतीय जनता पार्टीला बदनाम करणार असतील, देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करणार असतील, भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाला बदनाम करणार असतील, तर रामदास कदमांचे वक्तव्य आम्ही सहन करणार नाही. आपण त्यांना समज द्यावी आणि शिवसेनेकडून उदय सामंत साहेबांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. रामदास कदम वेळीच तुम्ही सुधारून घ्या एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगतो. २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे जेव्हा आंदोलन सुरू झालं जरांगे पाटलांचं, त्यावेळेला गेटवे ऑफ इंडियाला छत्रपती संभाजी महाराजांचा एक कार्यक्रम होता. तो कार्यक्रम गंगाधर काळकुटे, जे जरांगे पाटलांचे जवळचे व्यक्ती आहेत, त्यांनी तो कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमाचे स्वागताचे पोस्टर हे एकनाथ शिंदे साहेबांच्या फोटोने लागले होते. मग आम्ही आता असं म्हणायचं का, आंदोलन २३ ऑगस्टला झालं, त्याच्या आधी कार्यक्रम झाला, तर गंगाधर काळकुटेला तुम्ही पाठवलं होतंत म्हणून तुम्ही आंदोलन घडवलंत? म्हणून अशा प्रकारचे आरोप करून दोन वाघांमधल्या भांडणामध्ये तिसऱ्या मांजराचा लाभ करायला देऊ नका. रामदास कदम वेळीच तुम्ही सुधारून घ्या, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला आहे.
Source link
'रामदास कदम, हा फालतू धंदा बंद करा':प्रसाद लाड यांचा जोरदार पलटवार; म्हणाले- आवाज वाढवून बोललात म्हणजे आम्ही घाबरणार नाही