![]()
पुणे येथे सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील यांच्या ‘रानफुले’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यावेळी ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते, असे मत व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिवस आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यविश्व प्रकाशनने वनभवन, गोखलेनगर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते. पुणे वनवृत्त (प्रा) पुणेचे वनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रभावती वाघ, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, कवी डॉ. शेषराव पाटील, वर्षा शेषराव पाटील, प्रकाशक विक्रम मालन आप्पासो. शिंदे आणि रामदास पुजारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विठ्ठल वाघ यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कविता वाचकांना डोळस बनवते आणि शुद्ध सर्जनशील विचार मानवाला नवीन दृष्टी देतो. जल, जमीन आणि जंगल वाचवण्याची आज गरज निर्माण झाली आहे. पुढच्या पिढ्यांना मोकळा श्वास देण्यासाठी पर्यावरणातील घटकांचे जतन करणे महत्त्वाचे असून, यासाठी प्रबोधन आवश्यक आहे. कविता हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरते. डॉ. शेषराव पाटील यांची पर्यावरणावरील कविता आधुनिक काळातील ‘वनाचे श्लोक’ असून ती निसर्गाचे महत्त्व दर्शवते. काव्यसंग्रहाचे लेखक डॉ. शेषराव पाटील यांनी ‘रानफुले’ मध्ये पर्यावरणातील अनुभव, निरीक्षणे, गरजा, उपाय आणि संवर्धनाचे संचित मांडले असल्याचे सांगितले. पर्यावरण जनजागृती हा विचार घेऊन अनेक कविता लिहिल्याचे त्यांनी नमूद केले. रंगनाथ नाईकडे म्हणाले की, झाडे आणि वने ही वसुंधरेची कवचकुंडले आहेत. मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोडीतून पर्यावरणाचा नाश करत आहे. वसुंधरा वाचवण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा एकमेव उपाय आहे. पंकज गर्ग यांनी अलीकडे मानवी समाजात लिखाणाचे प्रमाण कमी झाल्याने लोकांची एकाग्रता कमी होत असल्याचे मत व्यक्त केले. लिहिणे, वाचणे आणि लिखाणाचे दस्तऐवजीकरण या आपल्या मूलभूत सवयी झाल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.या कार्यक्रमात डॉ. विठ्ठल वाघ यांनी शेती आणि मातीवरील अनेक कवितांचे गायनही केले.
Source link
डॉ. शेषराव पाटील यांच्या 'रानफुले' काव्यसंग्रहाचे प्रकाशन:डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले, कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी मिळते