Headlines

नांदेड पोलिसांची धडक कारवाई:सराईत चोरट्याकडून 15 दुचाकी जप्त, 6 लाख 62 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत




नांदेड शहर व जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांचा छडा लावत शिवाजीनगर पोलिसांनी सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ६ लाख ६२ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव व उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर बैजने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखालील पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. तपासादरम्यान रमेश शामराव कवायामक (वय ४०, रा. कु पटा, ता. किनवट, ह.मु. श्रावस्तीनगर, नांदेड) हा संशयित दुचाकीवर फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या ताब्यातून विविध ठिकाणांहून चोरीस गेलेल्या १५ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे शहरातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्यास मदत झाली असून, आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. या कारवाईत शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. तामसा-हदगाव मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तामसा-हदगाव राज्यमार्गावरील तळेगाव-कोळगाव फाट्याजवळ बुधवारी (दि. ८) दुपारी हायवा व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीस्वार विक्की नागेश सोनटक्के (वय ३२, रा. शेतमजुरवाडी, तामसा) यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, विक्की सोनटक्के हे मोटारसायकलवरून हदगावहून तामसाकडे येत असताना फेवरब्लॉक घेऊन भरधाव वेगाने येणाऱ्या हायवाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चुराडा झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर हायवा चालक पसार झाला. घटनेनंतर मृतदेह तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. विक्की यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. दरम्यान, तामसा-हदगाव मार्गावर गेल्या तीन महिन्यांत झालेला हा तिसरा जीवघेणा अपघात आहे. धोकादायक वळणांवर गतिरोधक, इशारा फलक व अन्य सुरक्षाविषयक उपाययोजनांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *