![]()
काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचा भोंदू म्हणून उल्लेख करत त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे संघाच्या व्यासपीठावर बोले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मनुवादी भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट असून, तीच भाषा बागेश्वर बाबा बोलत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बागेश्वर बाबा यांचा नागपुरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या भेटीचा दाखला देत उपरोक्त वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनीही या प्रकरणी त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, भोंदू धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा संघाच्या व्यासपीठावर येतो आणि आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हे सांगतो! या लोकांना वर्तमान माहीत नाही ते इतिहास सांगणार. शिवरायांनी थकून राजपाठ रामदास स्वामींकडे दिला असे धादांत खोटे आणि संघाच्या व्यासपीठावर बोलले जाते. हा महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे. मूळात रामदास स्वामी आणि महाराजांची भेटच झाली का? यावर प्रश्नचिन्ह आहे. मनुवादी भाजपचा छत्रपती शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट आहे आणि तीच भाषा हा बागेश्वर बाबा करत आहे. आणि याला मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री गडकरी, मोहन भागवत थांबवत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या या बागेश्वर बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. चार मुले काढून एक संघाला द्या, मग… सचिन सावंत पुढे म्हणाले, या बागेश्वर बाबाने अजून गुण उधळले तो म्हणाला चार मुले काढून एक संघाला द्या मग इतर तीन मुलांचे संगोपन, शिक्षण कसे करायचे? हे पण सांगा. बरं हे सांगणारा आणि ज्यांच्या व्यासपीठावर हे सांगतोय ते सर्व ब्रम्हचारी! जी गोष्ट करायची ती स्वतः पासून आधी अंमलात आणा. महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी आणि अशा लोकांना मान्यता दिल्याबद्दल आता संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वतः महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे ही आमची मागणी आहे. देशात भाजपमुळे भोंदूबाबांचे पीक भाजपा आणि संघाचे राजकारण पुढे नेण्यासाठी देशात भोंदू बाबांचे पीक भाजपाने आणले आहे. मोदी सरकार देशात आणण्यासाठी काही बाबांचीच मदत घेण्यात आली होती. काळा पैसा येणार, पेट्रोल ₹35 मध्ये मिळेल इत्यादि भाजपाच्या वल्गनांवर जनतेचा विश्वास बसावा यासाठी या बाबांचे योगदान होते. नंतरच्या काळात प्रवचने, कथा, किर्तने यांच्या नावाखाली समाजात द्वेष पसरविण्याचे पर्यायाने भाजपाचा प्रचार करण्याचे काम काही बाबां, बुवांना देण्यात आले आहे. काही बाबांना राजमान्यता देऊन त्यांचे प्रस्थ वाढवण्यासाठी मदत केली जाते. भोंदू खरात बरोबर महायुतीच्या नेत्यांची उठबस या त्या परिप्रेक्षात पाहिली पाहिजे. बागेश्वर बाबांची लोकांचे भविष्य सांगण्याची पध्दत काही वेगळी नाही. ही सर्व बाबा बुवा मंडळी मायेच्या आधीन आहेत. यांना ईश्वर कसा प्राप्त होईल? जीवनभर भक्ती करुन “भेटी लागली जीवा लागली ही आस , नको देवराया अंत आता पाहू” असे म्हणणारे आपले खरे संत आणि थेट हनुमानाशी संपर्क साधतो असे म्हणणारे हे रॉंग नंबर यातील फरक जनतेने जाणावा. आणि आता हे बाबा येऊन छत्रपतींचा इतिहास बदलू पाहत आहेत, यांना वेळीच रोखले पाहिजे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
Source link
भोंदू बागेश्वर बाबांकडून शिवरायांचा अपमान:भाजपचा शिवरायांचा इतिहास बदलण्याचा कट; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी