![]()
नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. गोदामाता सतत प्रवाहित, बारमाही करण्यासाठीही शासन स्तरावर प्रयत्न केले जात असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे शुभारंभ झाला. अहिल्यादेवींचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ही यात्रा सुरू केल्याचे स्पष्ट मत फडणवीस यांनी व्यक्त केले. वेदात नदीचे माहात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुतिसूक्तात ऋषी-मुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास यांचा समन्वय देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच अहिल्यादेवींच्या विचारांच्या आधारे भविष्यातील विकासाची दिशा दाखवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेशासाठी महत्त्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण करताना फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करताना आध्यात्मिकता आणि उपयुक्तता यांचा समन्वय साधला. पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेल्या बारवा आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. अण्णासाहेब मोरे म्हणाले, जलसाक्षरतेचे विचार सेवेकऱ्यांमार्फत पोहोचवण्यात येत आहेत. गुरुपीठाच्या माध्यमातून नदी स्वच्छता उपक्रम राबवण्यात येत आहे. देशाच्या विकासासाठी थोरामोठ्यांचे विचार भारतभर पोहोचवण्याचे काम करावे लागेल. या वेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते कुशावर्तातील जलकलश मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला आणि राज्यातील ३० नदीखोऱ्यांतील पाणी कलशांच्या माध्यमातून आणून त्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रेष्ठ भारत संदेश देणार अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापनाची सुरुवात नर्मदेतून केली. जलसाक्षरता आणि जलव्यवस्थापन ही काळाची गरज आहे. गोदावरी आणि नर्मदेला जोडून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ चा संदेश दिला जाणार आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी जलयात्रेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले. अहिल्यादेवींनी सुरू केलेली फड पद्धती उपयुक्त असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. – युवराज होळकर, अहिल्यादेवींचे वंशज
Source link
नदीजोड प्रकल्पामधून राज्य दुष्काळमुक्त करू- मुख्यमंत्री:नाशिकला ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ