Headlines

वृक्षारोपणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांचा हल्ला:जीव वाचवण्यासाठी पळापळ, 40 मुले जखमी; आगाशिव डोंगरावरील घटना




निसर्गाचे संवर्धन करण्याचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण आणि ‘सीडबॉल’ (बीज गोळे) प्रत्यारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर मधमाशांच्या एका मोठ्या थव्याने अचानक हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कराडजवळील आगाशिव डोंगरावर हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उडालेल्या गोंधळात आणि मधमाशांच्या दंशामुळे सुमारे ४० विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने, शिक्षकांनी दाखवलेली तत्परता आणि वेळेवर मिळालेल्या वैद्यकीय उपचारांमुळे मोठा अनर्थ टळला असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मलकापूरच्या आगाशिवनगर परिसरातील श्री लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ‘नूतन मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळे’तर्फे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा भाग म्हणून, इयत्ता आठवी आणि नववीतील सुमारे ५० विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आगाशिव डोंगरावर वन विभागाच्या कार्यालयामागील परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी गेले होते. अन् अचानक मधमाशा अंगावर आल्या डोंगरावर निसर्गाच्या सानिध्यात मुले अत्यंत उत्साहाने सीडबॉल टाकण्याचे आणि बीजारोपण करण्याचे काम करत होती. मात्र, काम सुरू असतानाच कुठूनतरी मधमाशांचा एक मोठा थवा थेट विद्यार्थ्यांच्या दिशेने आला आणि त्यांनी मुलांवर हल्ला चढवला. मधमाशांनी दंश करण्यास सुरुवात करताच मुलांमध्ये प्रचंड घबराट पसरली. स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी डोंगरावरून सैरावैरा धावण्यास सुरुवात केली. या अफाट गोंधळात आणि पळापळीत अनेक मुले दगडांवरून घसरून पडली, तर काहींना मधमाशांनी गंभीर चावा घेतला. यामुळे सुमारे ४० विद्यार्थी जखमी झाले. शिक्षकांची धावपळ आणि तातडीचे उपचार घटनेचे गांभीर्य ओळखून उपस्थित शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना लागलीच कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सर्व विद्यार्थ्यांवर तातडीने प्रथमोपचार सुरू केले. वेळेवर उपचार मिळाल्याने सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आणि समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुले सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपल्या मुलांना सुखरूप पाहून पालकांनीही सुटकेचा निःश्वास टाकला. मधमाशांचा हल्ला का झाला? वनविभागाच्या या परिसरातील झाडांवर मधमाशांची मोठी पोळी आहेत. मुलांच्या कामामुळे झालेला आवाज किंवा अनवधानाने एखाद्या पोळ्याला धक्का लागल्यामुळे मधमाशा बिथरल्या असाव्यात आणि त्यातूनच हा अनपेक्षित हल्ला झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे जंगलात किंवा डोंगराळ भागात निसर्ग उपक्रम राबवताना अधिक खबरदारी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. हे ही वाचा… वारीमध्ये वारकऱ्यांसाठी गढूळ पाण्याचा पुरवठा:जाहिरातींवर कोट्यवधींची उधळपट्टी, पण वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ; विरोधकांची सरकारवर टीका पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *