Headlines

शासकीय कर्करोग रुग्णालयात 108 रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी:कॅनडाच्या डॉ. ओटिंगर यांनी जागतिक दर्जाच्या सुविधांचे कौतुक केले




छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालय व महाविद्यालयात जागतिक दर्जाच्या सुविधा आणि उपचार पद्धती पाहून कॅनडाच्या मेडट्रॉनिकचे सीनियर डायरेक्टर डॉ. फ्रेंक ओटिंगर यांनी समाधान व्यक्त केले. रुग्णालयात वर्षभरात 108 यशस्वी रोबोटिक स्त्रीरोग कर्करोग शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आयोजित ‘रोबो 100’ सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. डॉ. ओटिंगर म्हणाले की, आज जगात अनेक राष्ट्रांत आरोग्यसेवेसाठी मनुष्यबळ कमी पडत आहे. अशा स्थितीत या रुग्णालयातील सुविधा आणि उपचार पद्धती अत्यंत कौतुकास्पद आहेत. त्यांनी घाटी आणि शासकीय कर्करोग रुग्णालयाचा परिसर पाहून आनंद व्यक्त केला. ‘रोबो 100’ सोहळा राज्य कर्करोग संस्थेत (शासकीय कर्करोग रुग्णालय) आयोजित करण्यात आला होता. रुग्णालयातील मोफत उपचार, अद्ययावत टीम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची यंत्रसामुग्री याबद्दल त्यांनी संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. या ऐतिहासिक विक्रमाबद्दल रुग्णालयाचे अभिनंदन करताना अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले की, रुग्णालयात पुढील सहा महिन्यांत एनएबीएल (NABL) दर्जाची अत्याधुनिक मॉलिक्युलर लॅब आणि आधुनिक रक्तपेढी सुरू करण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या सहा सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांमध्ये आता ‘डीएम प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजी’ आणि ‘पॅलिएटिव्ह केअर’ या दोन नव्या अभ्यासक्रमांची भर पडणार आहे, अशी माहितीही डॉ. सुक्रे यांनी दिली. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी रुग्णालयाच्या यशाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, “रुग्णालयात रुग्ण येऊच नये अशी आपली भावना असते, मात्र जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यांना सर्वोत्तम आणि दर्जेदार सेवा द्या.” स्त्रीरोग कर्करोग विभागप्रमुख डॉ. अर्चना राठोड-पवार यांनी प्रास्ताविकात सांगितले की, घाटी प्रशासन, डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि तंत्रज्ञ यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळेच 108 यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रियांचा हा टप्पा गाठणे शक्य झाले. या सोहळ्याला उपअधिष्ठाता डॉ. विनोद मुंदडा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, डॉ. भक्ती कल्याणकर, डॉ. बालाजी शेवाळकर, डॉ. जिरवणकर, डॉ. अंजली वासडीकर, डॉ. अदिती लिंगायत, डॉ. अजय बोराळकर, डॉ. रश्मी बंगाली, डॉ. किशोर सुलाने यांच्यासह सर्व विभागप्रमुख, निवासी डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *