![]()
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी आणि कोळगावचे ग्रामपंचायत अधिकारी शरद साहेबराव कवडे (वय ५३, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत काष्टी व कोळगाव, ता. श्रीगोंदा) यांच्यावर १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका २९ वर्षीय तरुणाने तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या वडिलांनी काष्टी येथे सिटी सर्व्हे क्र. १८१ मधील ४०.३५ चौरस मीटर बांधकाम व बखळ जागा खरेदी केली असून, १४४ चौरस फूट ग्रामपंचायत जागा वहिवाटीस मिळाली आहे. या खरेदी दस्ताची आणि संमती पत्राची ग्रामपंचायत दप्तरी (नमुना क्रमांक ११) नोंद करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी शरद कवडे यांनी १ लाख २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार १४ ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील हॉटेल स्वादमध्ये लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. यावेळी शरद कवडे यांनी पंचांसमक्ष सव्वा लाखांची लाच मागून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार गुन्हा नोंदवला. प्रक्रियेचे डिजिटलायझेशन केल्यास भ्रष्टाचार टळेल ग्रामपंचायत पातळीवरील मालमत्ता नोंदणी आणि नमुना ११ सारख्या प्रक्रियांमध्ये मानवी हस्तक्षेप हाच भ्रष्टाचाराचा मुख्य स्त्रोत आहे. सध्या या प्रक्रिया क्लिष्ट आणि अधिकाऱ्यांच्या मनमानीवर अवलंबून असल्याने सामान्य नागरिकांची मोठी अडवणूक होते. यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संपूर्ण प्रक्रियेचे डिजिटलायझेशन आवश्यक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत झाल्यानंतर आपोआप ग्रामपंचायत दप्तरी नोंद (ऑटोमॅटिक म्युटेशन) होण्याची ऑनलाईन व्यवस्था निर्माण केल्यास नागरिकांचा आणि अधिकाऱ्यांचा थेट संपर्क टळेल. यामुळे व्यवस्थेत पारदर्शकता येईल व लाचखोरीला चाप बसेल.
Source link
अहिल्यानगर:1.25 लाख रुपयांची लाच; ग्रा. पं. अधिकाऱ्यावर गुन्हा