Headlines

दुष्काळी जालन्यामध्ये ड्रोनद्वारे पाऊस पाडण्याची चाचपणी:400 मीटर उंचीवर केले प्रायोगिक क्लाउड सीडिंग




जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जालना शहराजवळील इस्लामवाडी येथील टेकडीवरून ड्रोनच्या साहाय्याने क्लाउड सीडिंगची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली. सुमारे ४०० मीटर उंचीवरून ढगांमध्ये क्षार-आधारित सीडिंग द्रव्याची फवारणी करण्यात आली. जालन्यात स्वदेशी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रथमच असा प्रयोग करण्यात आला. या प्रात्यक्षिकावेळी प्रद्युम्न मानधानी, डॉ. बळीराम बागल आदी उपस्थित होते. पारंपरिक विमानांच्या तुलनेत ड्रोनच्या माध्यमातून कमी खर्चात, विशिष्ट ठिकाणी आणि गरजेनुसार सीडिंग करता येऊ शकते का, याची पडताळणी या प्रयोगातून करण्यात आली. विशेष म्हणजे, पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) सोलापूरच्या दुष्काळी पट्ट्यात क्लाउड सीडिंगवर संशोधन केले आहे. या प्रयोगांमध्ये योग्य वातावरणीय परिस्थितीत पर्जन्यमानात वाढ होण्याचे निष्कर्ष नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे जालन्यातील या प्रयोगालाही भविष्यात महत्त्व प्राप्त होऊ शकते. सध्या अभ्यासाचा टप्पा जालन्यात राबवलेला हा उपक्रम सध्या प्रायोगिक स्वरूपाचा आहे. ड्रोनद्वारे सीडिंगचे द्रव्य योग्य उंचीवर आणि योग्य ढगांपर्यंत पोहोचवता येते का, याचा अभ्यास केला जाणार आहे. फवारणीची यंत्रणा किती परिणामकारक आहे याचाही अभ्यास होणार आहे. हवामानानुसार त्याचे परिणाम कसे बदलतात याचे निरीक्षण केले जाणार आहे. सीडिंग केलेल्या ढगांची आणि सीडिंग न केलेल्या ढगांची तुलना करण्यात येईल. इतर निरीक्षणे घेतली जातील. क्लाउड सीडिंग म्हणजे काय? क्लाउड सीडिंग म्हणजे ढगांमध्ये कृत्रिमरीत्या सूक्ष्म कण सोडून पावसाच्या निर्मितीच्या नैसर्गिक प्रक्रियेला चालना देणे. यामध्ये प्रामुख्याने दोन पद्धती वापरल्या जातात. हायग्रोस्कोपिक सीडिंगमध्ये मिठासारखे पाणी आकर्षित करणारे कण उबदार ढगांमध्ये सोडले जातात. त्यांच्याभोवती सूक्ष्म पाण्याचे थेंब एकत्र येतात. ते मोठे होतात. थेंब पुरेसे जड झाल्यानंतर पाऊस पडू शकतो. ग्लेशिओजेनिक सीडिंग पद्धतीत अतिथंड ढगांमध्ये सिल्व्हर आयोडाइडसारखे कण सोडले जातात. ते बर्फाच्या स्फटिकांच्या निर्मितीस चालना देतात. हे स्फटिक वाढतात. ते वितळल्यास पावसाचे थेंब तयार होऊ शकतात. —————— हेही वाचा.. दिवाळी सुटीत वाढ; आता 23 नोव्हेंबरला भरणार शाळा: 22 तारखेला रविवार असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदात आणखी भर दिवाळीच्या सुटीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांच्या दिवाळी सुटीत प्रशासनाने तीन दिवसांची वाढ केली आहे. पूर्वी २ ते १९ नोव्हेंबरपर्यंत असणारी सुटी आता २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यातच २२ नोव्हेंबरला रविवार येत असल्याने विद्यार्थ्यांना आणखी एका दिवसाची सुटी मिळेल. त्यामुळे आता थेट २३ नोव्हेंबरपासून शाळांच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *