Headlines

तुझी लायकी किती अन् बोलतो किती?:नीलेश राणेंच्या त्या ट्विटला नवनाथ बन यांचे प्रत्युत्तर; एका फोटोसह सूचक कॅप्शनने महायुतीत नवा राजकीय धुरळा




विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालानंतर महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत संघर्ष आता अत्यंत टोकाला पोहोचला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातील पराभवावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेनेवर उघडपणे खापर फोडल्यानंतर शिंदे सेनेचे नेते आमदार निलेश राणे यांनी थेट नवनाथ बन यांची लायकी काढत “तुला रडायलाही वेळ देणार नाही” असा उघडा इशारा दिला होता. मात्र, नीलेश राणेंच्या या आक्रमक ट्विटला नवनाथ बन यांनी थेट त्यांचे वडील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबतचा खास फोटो शेअर करत अत्यंत मर्मभेदी उत्तर दिले आहे. “ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लीडर नारायण राणे साहेब!” अशा अवघ्या एका ओळीच्या कॅप्शनने बन यांनी निलेश राणेंना त्यांची जागा दाखवून दिल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुणे पदवीधरमध्ये महायुतीचा घात झाल्याचा आरोप करत सुरू झालेला हा वाद आता नेत्यांच्या वैयक्तिक लायकी, वरिष्ठता आणि सोशल मीडिया वॉरपर्यंत येऊन ठेपला आहे. तू तेव्हा चड्डीत होतास, ऐऱ्यागैऱ्यांना मी मित्र बनवत नाही! -नीलेश राणे नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत नीलेश राणे हे माझे जवळचे मित्र असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर संतप्त होत आमदार नीलेश राणे यांनी सोशल मीडियावरून बन यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन हल्ला चढवला होता. “नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं. तुझी लायकी किती, तू बोलतो किती! याद राख, तुला रडायला पण वेळ देणार नाही,” असा सज्जड दम निलेश राणेंनी भरला. “नवनाथ बन माझा कसलाही मित्रबित्र नाही, तो माझा ज्युनियर आहे. मी 2009 मध्ये खासदार झालो होतो, तेव्हा तो चड्डीत फिरत होता. मी कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या व्यक्तीला मित्र बनवत नसतो.” भाजपवर समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप “मी स्वतः साताऱ्यात वाई आणि फलटणची जबाबदारी सांभाळत होतो. भाजप निवडणूक लढवत असताना त्यांनी आम्हाला साधा एक मेसेजही पाठवला नाही. माझ्या जिल्हाप्रमुखाला पत्ता नव्हता, भाजपचा एकही माणूस फिरकला नाही; तरीही आम्ही महायुती म्हणून सहकार्य केले. त्यामुळे काम कसे करायचे हे नवनाथ बनने आम्हाला शिकवू नये. तू कोण आहेस विचारणारा? आम्ही आमच्या नेत्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना उत्तर देऊ.” ‘नारायण राणे कार्ड’ वापरून नवनाथ बन यांचा पलटवार निलेश राणे यांनी राजकीय वरिष्ठता आणि अनुभवाचा दाखला देत नवनाथ बन यांना कनिष्ठ ठरवण्याचा प्रयत्न केला होता. यावर प्रत्युत्तर देण्यासाठी बन यांनी कोणत्याही शाब्दिक वादात न पडता थेट राजकीय खेळी केली. नवनाथ बन यांनी निलेश राणे यांचे वडील तथा भाजपचे वरिष्ठ नेते खा. नारायण राणे यांच्या शेजारी अत्यंत आपुलकीने बसलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या फोटोला त्यांनी “ज्युनिअर नवनाथ बन विथ सिनिअर लीडर नारायण राणे साहेब!” अशी अत्यंत सूचक आणि बोचरी कॅप्शन दिली. “तुम्ही मला ज्युनियर म्हणून हिणवत असाल, तरी माझी उठबस आणि संवाद थेट तुमच्या वडिलांशी म्हणजेच भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाशी आहे,” असा स्पष्ट संदेश नवनाथ बन यांनी या पोस्टमधून निलेश राणेंना दिला आहे. पुणे पराभवावरून महायुतीतील दरी रुंदावली पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव यांचा निसटता पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांवर थेट आरोप केले होते. रवींद्र धंगेकरांनी भाजप उमेदवाराविरोधात अधिकृत सोशल मीडिया पेजवरून प्रचार केल्याचे पुरावे भाजपने समोर आणले होते. अमरावतीमध्ये बंडखोरी करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी 6 वर्षांसाठी तात्काळ निलंबित केले; मग पुण्यात भाजपचा घात करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे कारवाई का करत नाहीत, असा जाब भाजपने विचारला होता. वरिष्ठ नेते अस्वस्थ भाजप आणि शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांमध्ये भररस्त्यात सुरू असलेल्या या आरोप-प्रत्यारोप आणि लायकी काढण्याच्या राजकारणामुळे महायुतीची प्रतिमा जनतेत डागाळत असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ही धुसफूस कशी थांबवायची, असा प्रश्न दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेतृत्वासमोर उभा राहिला आहे. ———————————————————— हेही वाचा… नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात: राष्ट्रपती मुर्मू ध्वजस्तंभ पूजन, ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणार; 22 महिने चालणार नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे आजपासून सिंहस्थ महाकुंभ मेळ्याची औपचारिक सुरुवात होणार आहे. दुपारी 12:02 वाजता रामकुंड येथे ध्वजारोहण होईल, ज्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी होतील. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन धार्मिक शहरांमध्ये दर 12 वर्षांनी महाकुंभ भरतो. लाखो भाविक गोदावरी नदीत पवित्र स्नान करतात. नाशिकमध्ये रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थावर स्नान केले जाते. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *