![]()
अमरावती शहरातील प्रवासी निवारे संबंधित यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पूर्णपणे बेदखल झाले आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रवाशांना या निवाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे, परंतु अनेक निवारे त्यांच्या मूळ उद्दिष्टांपासून कोसो दूर गेले आहेत. काही प्रवासी निवाऱ्यांमधील बेंचेस गायब झाले असून, त्या ठिकाणी इमारतीच्या बांधकामाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. तर काही निवाऱ्यांसमोर कचऱ्याचे ढिगारे लागले असून आसन व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. महापालिकेने मोठा खर्च करून हे निवारे उभारले होते, ज्यात चांगली आसन व्यवस्था, रंगरंगोटी आणि बसचे वेळापत्रक लावण्यात आले होते. मात्र, यापैकी एकही बाब आता शाबूत राहिलेली नाही. बहुतेक प्रवासी निवाऱ्यांची छते तुटली असून त्यांची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यावर लिहिलेली थांब्याची नावेसुद्धा आता दिसत नाहीत. मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील निवाऱ्यांची ही अवस्था आहे, तर शहरातील आतील जोडरस्त्यांवरील थांब्यांची स्थिती याहून वाईट असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी यासंदर्भात लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत, मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. समर्थ हायस्कूल चौक, सातुर्णा आणि राजकमल चौकातील वनिता समाजसमोरील बस थांब्यांचीही अशीच दयनीय अवस्था आहे. समर्थ हायस्कूल चौक हा अमरावती-बडनेरा या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावरील महत्त्वाचा थांबा आहे. नागरिकांकडून या अत्यंत गरजेच्या सोयी पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.
Source link
अमरावतीतील प्रवासी निवारे दुर्लक्षित:बसण्यासाठीचे बेंच गायब, कचऱ्याचे ढिगारे; प्रवाशांना उन्हाळ्यात नाहक त्रास