![]()
वरुड ते मोर्शी मार्गावरील हिवरखेडजवळ मंगळवारी (दि. २८) सकाळी एका भीषण कार अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीसह तिची आई आणि आजोबांचा समावेश आहे, तर वडील गंभीर जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील रहिवासी असून, लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. या अपघातात समाधान नान्ने (६२), किरण गोपाल नान्ने (२८) आणि दिया गोपाल नान्ने (३) यांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व विनायक कॉलनी, कामठी, खैरी, नागपूर येथील रहिवासी होते. कार चालक गोपाल समाधान नान्ने (३४) हे या अपघातात जखमी झाले आहेत. नान्ने कुटुंब बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी वॅगनार कारने निघाले होते. पहाटे नागपूरहून प्रस्थान केल्यानंतर ते वरुड-मोर्शी मार्गे संग्रामपूरकडे जात होते. वरुडपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरखेडजवळ खडका फाट्याजवळ सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की, कारमधील दिया, तिची आई किरण आणि आजोबा समाधान नान्ने यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चालक गोपाल नान्ने यांना हात व पायांना दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि बेनोडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी आणि मृतांना वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर तिघांना मृत घोषित केले, अशी माहिती बेनोडाचे ठाणेदार विवेक देशमुख यांनी दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Source link
कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:मृतांत चिमुकली, आई, आजोबांचा समावेश, वडील जखमी; वरुड ते मोर्शी मार्गावरील घटना