Headlines

सावरकरांनी विदेशी कापडांची होळी केली, तिथे नराधमांची होळी व्हावी:पुण्यातील मूक मोर्चात नसरापूर प्रकरणातील पीडित पित्याची मागणी




पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात रविवारी भव्य ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. “ज्या पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परकीय कापडांची होळी केली, त्याच पुण्यात अशा नराधमांची होळी व्हावी,” अशा शब्दांत पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जनसागराचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. भोर तालुक्यातील नसरापूर येथे १ मे रोजी ६५ वर्षीय नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ असे सांगून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. इतकेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा नराधम चिमुकलीचा हात धरून नेताना स्पष्ट दिसला आणि त्याचे पाप उघड झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या घटनेच्या निषेधार्थ रविवारी पुण्यात मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावेळी बोलताना पीडितेच्या वडिलांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले पीडितेचे वडील? मोर्चाच्या सांगता सभेत बोलताना पीडितेचे वडील म्हणाले, “आपण सर्व आज जो समाज म्हणून एकत्र जमलोय ते फक्त माझ्या मुली करता नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा समाज एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे या लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांची होळी व्हावी, यासाठी मूक मोर्चाची सांगता केली आहे.” पीडितेचे वडील म्हणाले, “असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करायला हवी, त्यामुळे असा प्रकार घडणार नाही. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नव्हता. समाज अजून जिवंत आहे. हे न्यायव्यवस्थेला दाखवून देण्यासाठी होता. आज आपण शांतता मोर्चा काढला. मात्र अशा मोर्चांनी हिंसेत वळन होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी.” प्रशासन अपेक्षापेक्षा उत्तम काम करतंय “माझ्या चिमुकलीला आणि इतर अत्याचार झालेल्या पिडीतांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपींना कठोर फाशीची शिक्षा करावी. असे मी निवेदन करतो. पुढे अशा घटना होऊ नये म्हणून कठोरात कठोर कायदा करावा, यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस प्रशासन, सरकार खूप चांगले सहकार्य करत आहे. पोलिस प्रशासन डे टू डे आम्हाला सगळी माहिती देत आहे. सरकार आणि प्रशासन माझी जी अपेक्षा होती त्यापेक्षा उत्तम काम करतायत. 11 तारखेला चार्चशीट दाखल होईल, असं पोलिसांनी मला निवेदन दिलेले आहे,” असे सांगत पीडितेच्या वडिलांनी पोलिसांच्या तपासावर समाधान व्यक्त केले. नराधमाची मुजोरी: ‘मारामारीची किरकोळ केस आहे!’ दरम्यान, या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, इतके भीषण कृत्य करूनही आरोपीला त्याचा लवलेशही पश्चात्ताप नाही. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी विचारले, “तुमची केस काय आहे माहिती आहे का?” त्यावर या नराधमाने अत्यंत थंडपणे उत्तर दिले की, “ही मारामारीची किरकोळ केस आहे.” या उत्तराने न्यायालयात उपस्थित असलेले सर्वच जण हादरले. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासात असे समोर आले आहे की, या नराधमाने केलेले हे पहिले कृत्य नाही. यापूर्वीही त्याने अशाच प्रकारच्या दोन घटना केल्या होत्या, मात्र ठोस पुराव्याअभावी तो निर्दोष सुटला होता. आता तिसऱ्या वेळी त्याने चिमुरडीचा जीव घेतल्यामुळे, त्याला कोणत्याही परिस्थितीत फाशीच मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *