Headlines

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहाद विरोधात आंदोलन:संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वात पुणे-अहिल्यानगर महामार्गावर रास्ता रोको




लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहादच्या चर्चांनंतर आता राज्यात ‘ट्रॅव्हल्स जिहाद’ नावाचा नवा प्रकार समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या कथित जिहादच्या विरोधात आणि हिंदू महिलांच्या सुरक्षेसाठी आज अहिल्यानगरमध्ये हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात नगर-पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक येथे भव्य ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. ट्रॅव्हल्स आणि सार्वजनिक वाहतुकीत हिंदू महिलांची छेडछाड होत असल्याचा आरोप करत यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनापूर्वी अहिल्यानगर शहरात एक भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीनंतर अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील कायनेटिक चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. यामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी गंभीर आरोप केले. पूर्वी राजस्थानसारख्या राज्यांमध्ये बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीतून महिलांच्या अब्रूवर हात टाकण्याचे प्रकार घडायचे, तसाच प्रकार आता महाराष्ट्रात एका विशिष्ट ‘जिहाद’च्या माध्यमातून डोके वर काढत असल्याचे त्यांनी सांगितले. लव्ह, लँड नंतर आता ट्रॅव्हल्स जिहाद आमदार जगताप पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून आपण लव्ह जिहाद ऐकायचो. मग लँड जिहादचा उदय झाला. व्होट जिहादचा उदय झाला आणि आता नुकताच नाशिक जिल्ह्यामध्ये कुठला जिहाद पाहिला असेल, तर तो आयटी जिहाद पाहायला मिळाला. आता आठ-दहा दिवसांपूर्वी ट्रॅव्हल जिहाद पाहायला मिळाला. संग्राम जगतापांच्या मते काय आहे ‘ट्रॅव्हल्स जिहाद’? आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी बोलताना या नव्या प्रकारावर सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले, ट्रॅव्हल जिहाद हा दिवसेंदिवस महाराष्ट्रात वाढत जाणारा जिहाद आहे. हिंदू समाजातील महिला ज्यावेळी प्रवासासाठी गाडीत बसतात, तो प्रवास एसटी बसमधून असो, खासगी वाहन किंवा रिक्षा असो. प्रवासावेळी महिला प्रवाशांचा त्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा महिलांना त्यांचे नाव विचारले जाते, सोशल मीडियावर महिलांना फॉलो केले जाते. त्यांचा नंबर मिळवला जातो, त्यांच्या घरापर्यंत लोक जातात. असे प्रकार वारंवार घडत चाललेले आहे. त्याविरोधात आम्ही आज हिंदू समाज म्हणून रास्ता रोको आंदोलन केले. पुढील काळात अशा घटना घडू नये आणि लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी यासाठी आंदोलन केले आहे, असे संग्राम जगताप यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *