![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. सध्या देशातील जवळपास 25 टक्के कामगारांना किमान वेतनही मिळत नाही. देश चालवणाऱ्यांना कामगारांची मेहनत दिसत नाही, फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. एसबीआयचा पीएलएफएस 2025 अहवाल नुकताच जारी झाला. विजय वडेट्टीवार यांनी या अहवालाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले, सबका साथ, सबका विकास म्हणणाऱ्या मोदी सरकारच्या काळात कामगारांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया च्या PLFS 2025 अहवालानुसार देशातील जवळपास 25% कंत्राटी कामगारांना किमान वेतनही मिळत नाही. महिलांची अवस्था तर आणखी वाईट आहे. देश चालवणाऱ्यांना मात्र कामगारांची मेहनत दिसत नाहीत, फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात. नवीन Labour Codes च्या नावाखाली भाजप सरकारने कामगारांचे हक्कच कमजोर केले आहेत. संप करायचा असेल तर 60 दिवस आधी नोटीस द्या, तक्रार प्रलंबित असेल तर संप बेकायदेशीर ठरेल, सुरक्षा नियम मोडले तरी पैसे भरून सुटका मिळेल. म्हणजे कामगारांनी फक्त काम करत राहायचं, प्रश्न विचारायचे नाहीत, हक्क मागायचे नाहीत. Ease of Doing Businessच्या नावाखाली Hardship of Living सामान्य जनतेच्या माथी मारलं जात आहे. भाजपची अर्थनीती आता स्पष्ट दिसते आहे. गरीबांची मेहनत स्वस्त करा, कामगारांचा आवाज दाबा आणि उद्योगपती मित्रांसाठी रेड कार्पेट अंथरा. पण लक्षात ठेवा, मजुरांच्या हाडांवर उभे केलेले महाल जास्त काळ टिकत नाहीत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवानाचाही घेतला समाचार विजय वडेट्टीवार यांनी यावेळी पंतप्रधानांनी जनतेला केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचाही खरपूस समाचार घेतला. तसेच 2008 च्या भयंकर जागतिक महामंदीचा काँग्रेसच्या कुशल नेतृत्वामुळे देशाला कोणताही फटका बसला नसल्याचाही दावा केला. ते म्हणाले, 2008 च्या महाभयंकर जागतिक मंदीतही ज्या देशाचं सुकाणू हललं नाही, मंदीचे चटके बसत असतानाही आपला देश सुरक्षित राहिला. तिथे आज महासत्तेच्या नावाखाली जनतेलाच त्याग करायला सांगितलं जातंय! 2014 मध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज सांगतात पेट्रोल, डिझेल वापरू नका, सोनं घेऊ नका, खाद्यतेल कमी करा! साहेब, देशाला बर्बाद करायचं कार्यक्रम तुम्ही करायचा आणि जबाबदारी मात्र जनतेने घ्यायची? पाच राज्याच्या निवडणुका होईपर्यंत युद्धाचा विसर पडला होता, आता निवडणुका संपल्या की लगेच ‘त्याग’ आठवला? सल्ले द्यायला फक्त पंतप्रधान, आणि भोगायला मात्र सामान्य जनता! वाह मोदीजी वाह, असे ते म्हणालेत.
Source link
मोदींच्या काळात कामगारांची अवस्था बिकट:सरकारला कामगारांची मेहनत नव्हे फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात – विजय वडेट्टीवार