Headlines

अलेक्झांडर हिंदुस्थानात हरला, तरी जगज्जेता का?:इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा सवाल




हिंदुस्थानचा इतिहास गौरवशाली असून संस्कृती आणि प्राचीनतेची समृद्धता आहे. असे असतानाही हिंदुस्थानात लढाई हरलेल्या अलेक्झांडरला जगज्जेता ठरवून आजही इतिहासाच्या अभ्यासक्रमात पहिला धडा त्याच्याविषयी का, असा प्रश्न ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उपस्थित केला. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था, पाञ्चजन्य फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शिवभूषण स्व. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्काराने पांडुरंग बलकवडे यांचा गौरव करण्यात आला. प्राच्यविद्या पंडित तसेच वाकाटक कालीन कला व स्थापत्य शास्त्राचे जाणकार डॉ. अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी वासंती बेडेकर, कौस्तुभ कस्तुरे, समीर कुलकर्णी मंचावर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना पांडुरंग बलकवडे म्हणाले की, आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे. या हेतूने इतिहास संशोधन क्षेत्रातील पद्मविभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांचे कार्य महनीय आहे. मराठेशाहीचा इतिहास समजून घेण्यासाठी निनाद बेडेकर यांनी मोडी लिपीसह पर्शियन भाषा आत्मसात केली, तसेच पोर्तुगीज, डच, फ्रेंच अशा विविध साधनांचा अभ्यासही केला. त्यांनी मराठेशाहीच्या इतिहासाला जीवन समर्पित करत शेकडो किल्ल्यांचा अभ्यास केला आणि युवा पिढीला प्रोत्साहित केले. त्यांच्या पश्चात हे कार्य युवा पिढीकडून सुरू आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे. बलकवडे यांनी पुढे सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. याचा संदर्भ इतिहासाच्या अभ्यासात का नाही, मराठ्यांना हक्काचा न्याय का मिळाला नाही, याविषयी प्रश्न उपस्थित होणे गरजेचे आहे. २२०० पानांचा मराठेशाहीचा इतिहास असताना एनसीईआरटीच्या पुस्तकात फक्त दोन पाने मराठेशाहीच्या इतिहासाविषयी असून महाराष्ट्रातील संतांची महान परंपरा असलेला इतिहास देखील अर्ध्या पानातच मांडण्यात आला आहे. महाराष्ट्राचा इतिहास एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना पुन्हा एकदा एकत्र यावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ. अरविंद जामखेडकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासाशिवाय इतिहास समजणे सोपे नाही. इंग्रजांचा इतिहास हा पराभवाचा इतिहास आहे; परंतु इंग्रजांनी भारतीयांकडे हीनतेने पाहिल्यामुळे स्वातंत्र्यानंतर पुढे आलेला भारताचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला गेला आहे. इतिहास हा पुनरावलोकन करून सांगण्याची, लिहिण्याची, विचार करण्याची पद्धत असून अंतर्मुख होऊन स्वतःला जाणून घेत आत्मज्ञान करून घेण्याची घटना आहे. इतिहासातील पुरावे प्रक्षिप्त नाहीत हे सांगण्यासाठी इतिहास, मौखिक परंपरा, उपासना पद्धती, पुराणे, समकालीन अभिलेख यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *