![]()
“राज्यात गँगस्टर राज आणि गुन्हेगारीचा कणा दिवंगत गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात युती सरकारने कायमचा मोडून काढला होता. ‘पोलिसांची एकही गोळी वाया जाता कामा नये’ या शिवसेनाप्रमुखांच्या आदेशामुळे सर्व गुन्हेगार अंडरग्राऊंड झाले होते किंवा देश सोडून पळाले होते. ती परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात उद्भवू नये यासाठी महायुती सरकार अत्यंत कठोर पावले उचलत आहे. मात्र, संजय राऊतांसारखे बिनबुडाचे नेते केवळ राजकीय पोळी पिकवण्यासाठी बेछूट विधाने करत आहेत. अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे गेले; पण जर ते ठाण्यात दिवंगत प्रदीप पुर्णेकर यांच्या घरी गेले असते, तर ‘एकनाथ शिंदे कुटुंबीयांना धमकावण्यासाठी गेले’ असा कांगावा याच राऊतांनी केला असता. त्यामुळेच कोणताही गैरसमज होऊ नये म्हणून आमदार प्रताप सरनाईक तिथे गेले होते,” असा खुलासा राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार, कायदा व सुव्यवस्था, संजय राऊतांचे ‘रेझिम चेंज’चे दावे, दसरा मेळाव्याची भाषा आणि मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील महायुतीतील अंतर्गत घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. बाळासाहेबांची शिवसेना इमॅच्युअर होती का? संजय राऊत यांनी शिवसेनेचा 60 वा दसरा मेळावा आणि “शिवसेना आता सीनियर सिटीजन आणि प्रगल्भ झाली आहे” या केलेल्या वक्तव्याचा शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला. “राऊत म्हणतात शिवसेना आता प्रगल्भ आणि ज्येष्ठ झाली आहे. याचा अर्थ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चालवलेली मूळ शिवसेना बालवयातील आणि अपरिपक्व होती का? बोलताना कमीत कमी स्वतःच्या जिभेला तरी लगाम घातला पाहिजे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना आता कसली प्रगल्भता सुचतेय?” उबाठा गट म्हणजे कुंभकर्णाचा अवतार “उद्या शिवतीर्थावर होणाऱ्या यांच्या मेळाव्यात व्यासपीठावर नेमकी किती माणसे उरली आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. पक्ष पूर्णपणे गर्तेत गेला आहे, रसातळाला पोहोचला आहे, तरीही ‘रेझिम चेंज’च्या पोकळ वल्गना सुरू आहेत. काँग्रेस तुम्हाला फुकट विचारत नाही, शरद पवार तुम्हाला किंमत देत नाहीत; तरीही सत्तेची दिवास्वप्ने पाहणारा उबाठा गट म्हणजे प्रत्यक्ष कुंभकर्णाचाच अवतार आहे.” सत्तेत असताना आमदार सांभाळता आले नाहीत “‘उद्धव ठाकरेंच्या हातात सत्ता येऊ द्या, मग बघा कोण कुठे पळतंय’ अशी धमकी राऊत देत आहेत. अहो, तुमच्या हातात सत्ता असताना मुख्यमंत्री पदावर बसलेल्या माणसाच्या डोळ्यांदेखत 40 आमदारांनी बंड केले आणि आम्ही थेट बाहेर पडलो. स्वतःच्या हातातील सत्ता सांभाळता न येणे आणि डोळ्यांदेखत पक्ष फुटणे यापेक्षा मोठे राजकीय अपयश कोणते असू शकते? आता सत्तेची स्वप्ने पाहणे बंद करा आणि उरलासुरला पक्ष सांभाळा,” असा टोला त्यांनी लगावला. गँगवॉर पुन्हा डोके वर काढू देणार नाही गृहखात्यावर होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “विरोधक म्हणतात की गृहखात्याचा वापर केवळ विरोधकांना अडकवण्यासाठी होतोय. मग बीड असो, कल्याण-डोंबिवली असो किंवा राज्यातील इतर संवेदनशील खटले असोत; गुन्हेगारांना जलद गतीने फाशीची शिक्षा देण्यापासून ते मोक्का व एमपीडीए (MPDA) अंतर्गत तुरुंगात डांबण्याचे काम याच सरकारने केले आहे. गुन्हेगारांवर वचक बसवणे हेच महायुतीचे धोरण आहे.” नारायण राणेंना जेवणाच्या ताटावरून अटक केली होती “गृहमंत्री आणि सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असे म्हणणाऱ्यांना स्वतःची लाज उरली आहे का? तुमच्या अडीच वर्षांच्या काळात काय घडले होते? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला जेवणाच्या ताटावरून उठवून अटक करणे हेच काय तुमचे कर्तृत्व होते? केवळ घरात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुन्हेगार पकडता येत नाहीत; आजचे सरकार स्वतः रस्त्यावर उतरून धाडसाने निर्णय घेते.” बॉलिवूडला टार्गेट करून दहशत पसरवण्याचा डाव उधळू टायगर श्रॉफवरील हल्ल्यावर हिंदीतून स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “फिल्मी जगतातील कलाकारांना टार्गेट करून स्वस्त प्रसिद्धी मिळवणे आणि मुंबईत पुन्हा 90 च्या दशकासारखी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही टोळ्या करत आहेत. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट आदेश दिले असून सर्व हल्लेखोरांना मुळासकट उखडून टाकले जाईल. 2022 पासून संजय राऊत ‘सरकार 15 दिवसांत पडेल, 1 महिन्यात पडेल’ अशी स्वप्ने पाहत आहेत; आज 2 वर्षे उलटून गेली तरी सरकार पूर्ण बहुमताने आणि वेगाने काम करत आहे.” सतीश चव्हाणांना पाठिंबा हाच पक्षाचा निर्णय; अब्दुल सत्तारांशी चर्चा होणार मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमधील मतभेदांवर त्यांनी खुलासा केला. “पदवीधर निवडणुकीबाबत पक्षाने माझ्यावर जी जबाबदारी दिली आणि पक्षाची जी अधिकृत भूमिका आहे, तीच मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून मांडली आहे. सुरुवातीला पाठिंबा मागे घेण्याचा निर्णय झाला होता; मात्र त्यानंतर अमरावतीमधील राजकीय घडामोडींनंतर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यानुसार मी ती घोषणा केली.” सत्तार-शिंदे यांच्यात संवाद होईल “अब्दुल सत्तार यांनी सतीश चव्हाण यांच्यावर पूर्वी पक्ष संपवल्याचा आरोप केला आहे. स्थानिक पातळीवर काही मतभेद किंवा कटू अनुभव असू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित सत्तारांपर्यंत पक्षाचा अंतिम निरोप पोहोचण्यात विलंब झाला असावा. मात्र, पक्षाने एकदा अधिकृत भूमिका जाहीर केल्यानंतर सर्वांना पक्षादेश पाळावाच लागतो. एकनाथ शिंदे साहेब स्वतः अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा करतील आणि यावर तोडगा काढतील. आमच्यात कोणतीही कुरघोडी नाही,” असे संजय शिरसाट यांनी शेवटी स्पष्ट केले. ————————————————————– हेही वाचा… आरोपींचे आका कुठेही लपलेले असोत, त्यांना शोधून काढू: टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा गँगस्टर्सना इशारा जुहूसारख्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या धक्कादायक घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या तपासाची माहिती दिली. पोलिसांनी रातोरात आरोपींची ओळख पटवली असून, हे भ्याड हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड (आका) जगाच्या पाठीवर कुठेही लपले असले, तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
गोपीनाथ मुंडेंसारखा गँगस्टरचा कणा पुन्हा मोडून काढू!:पूर्णेकरांच्या घरी गेलो असतो तर धमकावल्याचा आरोप केला असता, संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर पलटवार