![]()
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी म.रा. विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने महिनाभराआधीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र सरकारने अद्याप कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे हा संप अटळ आहे. त्याच्या तयारीसाठी आज, सोमवार ११ मे रोजी द्वारसभा घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावित संप-वजा-आंदोलनामुळे विद्यापीठांच्या शैक्षणिक व परीक्षा कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्यापीठाच्या सिनेट सभागृहात पार पडलेल्या या सभेला संयुक्त कृती समितीचे समन्वयक तथा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी संबोधित केले. यावेळी महासचिव नरेंद्र घाटोळ, विद्यापीठ ऑफिसर्स फोरमचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे, सचिव डॉ. विलास नांदुरकर व विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बारस्कर उपस्थित होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या १४ मेपासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार १०, २० व ३० वर्षांनंतर देय असलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तात्काळ लागू करण्यात यावी. सन २००५ पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर नियुक्ती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सन १९८८-८९ पासून नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये सरळ सेवेने मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक पदांवर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत. न्यायप्रविष्ट नसलेल्या महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यकांना सहावा व सातवा वेतन आयोग लागू करून ग्रेड पे रुपये २४०० प्रमाणे वेतननिश्चिती करण्यात यावी. या मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली आहेत. आता निर्णय झाल्याशिवाय कर्मचारी शांत बसणार नाहीत. अशी भूमिका समितीचे प्रमुख अजय देशमुख, डॉ. नितीन कोळी व शशिकांत रोडे यांनी मांडली आहे. यावेळी विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाचे टप्पे पहिल्या टप्प्यात १४ ते १६ मेदरम्यान सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल. १८ ते २० मे या कालावधीत धरणे व निषेध सभा घेतली जाईल. घोषणाबाजी केली जाईल. २५ मे रोजी एकदिवसीय लेखणी बंद आंदोलन होणार आहे. २९ मे रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन होईल. त्यानंतर १ जून रोजी लाक्षणिक कामबंद होईल. ८ जूनपासून संप करण्यात येईल.
Source link
आंदोलन अटळ; विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी घेतली द्वारसभा:धरणे, मोर्चा निघणार, 1 जून रोजी कामबंद, 8 पासून संप