Headlines

12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द:विधानसभा अध्यक्षांचा मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; अमित साटम यांच्याकडून मात्र हरताळ




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-अमेरिका युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जनतेला इंधनाची काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 आमदारांच्या शिष्टमंडळाचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मात्र मोदींच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. कारण, त्यांच्या नालेसफाईची पाहणी करण्याच्या दौऱ्यात तब्बल 25 गाड्यांचा ताफा दिसून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे आपण इंधनाचा जपून वापर केला पाहिजे. स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्य विधिमंडळाच्या 12 आमदारांचा जपान दौरा रद्द करण्याची घोषणा केली आहे. जपानच्या 2 राज्यांनी दिले होते निमंत्रण जपानच्या 2 राज्यांच्या राज्यपालांनी राज्य विधिमंडळाच्या आमदारांना जपान दौऱ्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार, 12 आमदारांचे एक शिष्टमंडळ लवकरच जपानच्या दौऱ्यावर जाणार होते. पण आता पंतप्रधानांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांचा हा प्रस्तावित जपान दौरा रद्द केला. त्यांच्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळात स्वागत होत आहे. अमित साटम यांचे मोदींच्या आवाहनाला हरताळ दुसरीकडे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला हरताळ फासल्याची बाब समोर आली आहे. अमित साटम यांनी नुकतीच मुंबईतील नालेसफाईच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या ताफ्यात तब्बल 25 गाड्या दिसून आल्या. यात अमित साटम यांच्या स्वतःसाठीच्या 2 गाड्या, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्या गाड्यांचा समावेश होता. त्यांच्या या दौऱ्यावर आता राजकीय वर्तुळातून टीका केली जात आहे. विशेषतः त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनाला हरताळ फासल्याचा आरोप केला जात आहे. अमित साटम यांच्या गाड्या कदाचित पाण्यावर चालत असतील – रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी अमित साटम यांच्यावर उपरोधिक निशाणा साधला आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या आवाहनाला मुंबई भाजपा अध्यक्ष समित साटम यांचा 25 गाड्यांच्या ताफ्यासह उदंड प्रतिसाद! कदाचित त्यांच्या गाड्या पाण्यावर चालत असाव्यात..! भाजीला पाण्याने फोडणी कशी द्यावी याचाही डेमो भाजपा नेत्यांनी जनतेला लवकरच द्यायला हवा! सत्ताधाऱ्यांची अवस्था म्हणजे, ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशीच झालीय, असे ते म्हणालेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *