महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तेथील गैरसोयींवरून प्रशासनाला धारेवर धरले. वसतिगृहातील निकृष्ट जेवण आणि अस्वच्छतेवरून त्यांनी वसतिगृह अधीक्षकांना चांगलेच झापले. तसेच, महाविद्यालया
.
जेवणात अळ्या, पाण्यात किडे
महाविद्यालयात मनसे शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव वसतिगृह, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि कॅन्टीनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले, “मेसच्या जेवणात अळ्या मिळतात, पिण्याच्या पाण्यात किडे सापडतात आणि मूलभूत सुविधांचीही अत्यंत वाईट अवस्था आहे.” विद्यार्थ्यांची ही दयनीय परिस्थिती पाहून आपण भावुक झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला.
पंतप्रधान मोदींच्या फोटोवर आक्षेप

याच पाहणीदरम्यान महाविद्यालयातील एका भिंतीवर लावण्यात आलेल्या फोटोंवरूनही अमित ठाकरेंनी आक्षेप घेतला. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला होता. एका विद्यार्थ्याने याकडे लक्ष वेधल्यानंतर अमित ठाकरे आक्रमक झाले. “छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी मोदींचा फोटो नको,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अमित ठाकरे पुण्यातील एकूण सात महाविद्यालयांना भेटी देऊन ‘Gen Z’ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी, समस्या, अपेक्षा आणि विविध प्रश्न जाणून घेतले जाणार आहेत.
संबंधित बातमी वाचा..
मराठीपेक्षा सरकारला ‘यूपी’च्या निवडणुका महत्त्वाच्या?: मुदतवाढीवरून अमित ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, चालकांना दिला मनसे स्टाईल कारवाईचा इशारा

राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. या वर्षभरात त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान या निर्णयाचा समाचार घेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. सविस्तर वाचा