![]()
भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक विद्यार्थी, महिला आणि बालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक प्रभावी प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. डॉ. गोऱ्हे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय ‘भटके-विमुक्त दिवस’ कार्यक्रमात बोलत होत्या. महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भटके-विमुक्त समाजातील महिलांना सामाजिक, आर्थिक वंचिततेसोबतच लिंगभेदाचाही सामना करावा लागतो, असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. या भेदभावाविरोधात व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांचे शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता आणि कायदेविषयक जागरूकतेसाठी स्वतंत्र व परिणामकारक उपक्रम राबवण्याचे आवाहन त्यांनी केले. उपजीविकेसाठी गावोगावी फिरणाऱ्या समाजातील नागरिकांकडे संशयाने पाहण्याची मानसिकता बदलली पाहिजे. त्यांना सन्मान आणि समान संधी मिळणे आवश्यक आहे, असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. युवकांसाठी अनेक योजना असल्या तरी काही विद्यार्थी आणि बालके लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे योजनांच्या लाभार्थ्यांची विभागनिहाय आकडेवारी संकलित करून कोणताही घटक मागे राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे काम चांगले सुरू आहे. तरीही, भटके-विमुक्त समाजातील विविध जाती-जमातींच्या गरजा लक्षात घेऊन महिला, बालके आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आखले जावेत. योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचल्यास अधिकाधिक नागरिकांना त्यांचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे यांनी भटके-विमुक्त समाजाची पारंपरिक वेशभूषा, स्वतंत्र बोलीभाषा, कला आणि लोकसंस्कृती ही समृद्ध ओळख असल्याचे सांगितले. तिचे संवर्धन होणे आवश्यक आहे. मात्र, ही ओळख केवळ वेशभूषेपुरती मर्यादित नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिक्षणाच्या प्रकाशात अन्याय आणि विषमतेविरुद्ध लढण्याची प्रेरणादेखील आपल्या ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील नव्या पिढीने शिक्षणाची कास धरून मुख्य प्रवाहात यावे, आपल्या बोलीभाषा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करावे, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या विकासासह समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी शासन आणि संबंधित विभागाला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाहीही डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिली.
Source link
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे भटके-विमुक्त समाजाला आवाहन:शिक्षणाने प्रगती साधत योजनांचा लाभ घ्यावा