![]()
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्रासाठी गणेशोत्सवाचा आदर्श घालून देणारा ‘पुणे पॅटर्न’ तयार करण्याची मागणी केली आहे. डीजे, प्लाझ्मा आणि लेझर लाईटसारख्या गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालावी, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कोणत्याही जाती-धर्माचा सण किंवा उत्सव असला तरी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. उत्सवांमध्ये डीजे, प्लाझ्मा आणि लेझर लाईटचा वापर पूर्णपणे थांबवावा, अशी त्यांची भूमिका आहे. दहीहंडी आणि गणेशोत्सवातील वर्तनावर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला. अर्धनग्न अवस्थेत महिला दहीहंडीसाठी येऊन अंगविक्षेप करत असतील, तर हे श्रीकृष्ण किंवा गणपतीला आवडेल का, असा सवाल त्यांनी केला. मंडळांनी, कार्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी यावर विचार करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या अनेक वर्षांपासून डीजे, गोंगाट आणि उत्सवाला गालबोट लावणाऱ्या गोष्टींविरोधात आपण भूमिका मांडत आलो असल्याचे प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे केवळ गणेशोत्सवच नाही, तर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही डीजेचा दणदणाट बंद व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. सण-उत्सवांच्या काळात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजेमुळे लहान मुले, वृद्ध नागरिक, उच्च रक्तदाब आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना तीव्र त्रास सहन करावा लागतो. उत्सव साजरा करत असताना या सगळ्याचा अवश्य विचार व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले. गोंगाटामुळे उत्सवाच्या काळात नागरिकांना शहरातून स्थलांतरित होण्याची वेळ येऊ नये. न्यायालयाने घालून दिलेल्या आवाजाच्या मर्यादा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच, गणेशोत्सवाच्या काळात गुटख्याच्या किंवा आरोग्यास घातक असणाऱ्या उत्पादनांच्या सरोगेट (छुप्या) जाहिराती स्वीकारू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. लोकमान्य टिळक यांनी समाजप्रबोधनाच्या उद्देशाने गणेशोत्सव सार्वजनिक केला होता. त्यामुळे यामध्ये व्याख्याने, वैचारिक देवाणघेवाण, मुलांसाठी विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रम यांसारख्या समाजासाठी उपयुक्त गोष्टी व्हायला हव्यात. पुण्यातील बरीच मंडळे अशाप्रकारे प्रबोधनपूर्ण उत्सव साजरा करतात, अशा मंडळांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे डॉ. कुलकर्णी म्हणाल्या. यावर्षी पुण्यातील सुमारे २०० गणेश मंडळांनी डीजे न वापरता विधायक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे अनुकरण इतर मंडळांनीही करावे आणि हा उत्सव समाजातील सगळ्यांनाच सुसह्य कसा होईल, याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. अश्लील गाणी आणि धर्माला न शोभणारे वर्तन अशाप्रकारे उत्सव साजरे करू नयेत. पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करताना सभ्यता राखावी आणि सर्वसामान्य पुणेकरांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ नये, अशी परिस्थिती निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आपल्या देशात ध्वनीप्रदूषणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते, तर इतर देशांत पर्यावरण जपण्यासाठी कडक नियम आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
Source link
डीजे-लेझरमुक्त गणेशोत्सवाचा ‘पुणे पॅटर्न’ निर्माण करा:मेधा कुलकर्णींचा सवाल- ‘अंगविक्षेप कृष्णाला, गणपतीला आवडेल का?’