Headlines

हिंगोली जिल्ह्यातील 85 हजार 316 मतदार वगळले:नवीन 23 मतदान केंद्रांची निर्मिती, उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांची माहिती




हिंगोली जिल्ह्यात मतदार विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून तब्बल 85 हजार 316 मतदार वगळण्यात आले आहेत. गणनापत्रक न जमा केल्यामुळे किंवा इतर विसंगतींमुळे ही नावे प्रारूप मतदार यादीतून कमी करण्यात आली आहेत. तसेच 23 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आल्याची माहिती निवडणुक उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांनी दिली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय वगळण्यात आलेले मतदारांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघात एकूण 27,759 मतदार वगळण्यात आले आहेत. यामध्ये 3,200 गैरहजर, 13,509 कायमस्वरूपी स्थलांतरित, 8,151 मृत आणि 2,857 दुबार किंवा अन्य नोंदी असलेले मतदार समाविष्ट आहेत. कळमनुरी मतदारसंघात एकूण 25,724 मतदार वगळण्यात आले आहेत. यामध्ये 2,387 गैरहजर, 13,615 कायमस्वरूपी स्थलांतरित, 6,197 मृत आणि 3,453 दुबार किंवा अन्य नोंदी असलेले मतदार समाविष्ट आहेत. हिंगोली मतदारसंघात एकूण 31,833 मतदार वगळण्यात आले आहेत. यामध्ये 6,235 गैरहजर, 14,752 कायमस्वरूपी स्थलांतरित, 7,169 मृत आणि 3,616 दुबार किंवा अन्य नोंदी असलेले मतदार समाविष्ट आहेत. विशेष सखोल पुनरिक्षणानंतर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीनुसार हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदार संख्या 8 लाख 84 हजार 76 इतकी झाली आहे. यामध्ये वसमत एकूण मतदार 2,90,221 (पुरुष 150,553, स्त्री 139,664, इतर 4). कळमनुरी एकूण मतदार 2,98,854 (पुरुष 156,303, स्त्री 142,547, इतर 4). हिंगोली एकूण मतदार 2,95,001 (पुरुष 154,355, स्त्री 140,642, इतर 4) मतदारांचा समावेश आहे. मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात आले असून एकूण 23 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. वसमत मतदारसंघात 12 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आली असून येथील एकूण मतदान केंद्रांची संख्या 339 झाली आहे. कळमनुरी मतदारसंघात 8 नवीन मतदान केंद्र तयार झाली असून 3 मतदान केंद्र शेजारील केंद्रात समाविष्ट करण्यात आली आहेत; ज्यामुळे येथील एकूण केंद्रांची संख्या 353 झाली आहे. हिंगोली मतदारसंघात 3 नवीन मतदान केंद्र तयार करण्यात आली असून एकूण केंद्रांची संख्या 346 झाली आहे. या बदलांमुळे हिंगोली जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या 1015 वरून वाढून आता 1038 झाली आहे. दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट नाहीत किंवा जे नवमतदार 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करत आहेत, त्यांना आपले नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नमुना 6 भरून अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी प्रगती चोंडेकर यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *