Headlines

खोपोलीत तीन दिवसीय राष्ट्रीय शिक्षण परिषद:शिक्षणतज्ज्ञ मांडणार भविष्यातील शिक्षणाची दिशा




खोपोली येथे 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘द स्कूल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट 2026’ या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक शैक्षणिक मूल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भारताच्या शिक्षण क्षेत्राला भविष्योन्मुख दिशा देणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. नोव्होटेल इमॅजिका येथे होणाऱ्या या परिषदेत देशभरातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, नामांकित शाळांचे संस्थापक, प्राचार्य, धोरणकर्ते आणि शैक्षणिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधक सहभागी होणार आहेत. मालपाणी ग्रुपचे संचालक यशवर्धन मालपाणी यांनी ही माहिती दिली. यावेळी द स्कूल्स ऑफ इंडियाचे संस्थापक अनिकेत पुष्पराज वर्मा आणि ध्रुव स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिष्का मालपाणी उपस्थित होत्या. या परिषदेत केवळ औपचारिक चर्चांऐवजी प्रत्यक्ष अंमलात आणता येतील अशा धोरणात्मक उपायांवर भर दिला जाईल, असे अनिकेत पुष्पराज वर्मा यांनी सांगितले. आधुनिक अध्यापन पद्धती, अभ्यासक्रमातील नावीन्य, शालेय नेतृत्व व संस्थात्मक व्यवस्थापन, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि सर्वांगीण विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारमंथन केले जाईल. शालेय शिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सुरक्षित आणि परिणामकारक वापर कसा करता येईल, यावर विशेष कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. परिषदेदरम्यान शैक्षणिक तंत्रज्ञान, स्मार्ट वर्गखोल्या, नवउद्योजकांची उत्पादने आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे. या परिषदेत अवसरा अकादमीच्या लक्ष्मी कुमार, मालपाणी ग्रुप ऑफ स्कूल्सचे संजय मालपाणी, डॉ. स्वाती पोपट वात्स, रसेल जॉन कॅली, सीथा मूर्ती, अलका पांडे, परिमल मर्चंट आणि मृणाल शाह यांसह विविध क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. देशातील शिक्षण व्यवस्थेतील बदल, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेता, ही परिषद भारतीय शिक्षणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *