- Marathi News
- National
- Maharashtra Bus Accident In Gujarat Updates: Fire Erupts After Collision, 5 Dead
5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात झाला. बारडोलीच्या उवा गावाजवळ महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या MH-१८ BZ – १२५८ आणि MH-२० BL-३३९० या दोन बसची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात ५ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर उलटलेल्या एका टँकरला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला असून, एक बस सीएनजीवर चालणारी असल्याने धडकेनंतर काही वेळातच तिला आग लागली. ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारडोली-उवा महामार्गावर एक टँकर पलटी झाला होता. या पलटी झालेल्या टँकरला धडक टाळण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या एसटी बस चालकाने गाडी वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेगावर नियंत्रण न राहिल्याने बस चालकाचा ताबा सुटला. बस थेट दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर गेली आणि समोरून येणाऱ्या महाराष्ट्र पासिंगच्या दुसऱ्या एका भरधाव एसटी बसला या बसने जोरदार धडक दिली.
सीएनजीमुळे बसचा कोळसा
ही समोरासमोरची धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले. एका बसचा समोरचा भागाचा चेंदामेंदा झाला असून, दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. रस्त्यावरून खाली गेलेली बस सीएनजीवर चालणारी होती. धडक बसताच इंधनाची गळती होऊन बसला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला होता.
बचाव कार्य आणि वाहतूक कोंडी
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने बचाव कार्यात मोठे अडथळे येत होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.