![]()
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नीट परीक्षेसाठी हवाई दलाचा वापर करण्यास कडाडून विरोध केला आहे. भारतीय हवाई दल हे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अस्तित्वात आहे, ते भाजपचा नाकर
.
केंद्र सरकारने नीट पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट हवाई दलाची मदत घेण्याच्या मुद्यावर गांभिर्याने विचार सुरू केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावानुसार, हवाई दलाच्या विमनाांचा व त्यांच्या कडक सुरक्षा प्रोटोकॉलचा वापर करून नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका थेट व सुरक्षितपणे वितरित केल्या जाणार आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला जागा उरणार नाही. या प्रस्तावावर अंतिम निर्णय पीएमओच्या मंजुरीनंतर घेतला जाईल. या सर्व प्रक्रियेवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नजर आहे. या पार्श्वभूमीवर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी या निर्णयावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?
प्रकाश आंबेडकर या प्रकरणीची एक बातमी पोस्ट करताना म्हणाले की, हा कसला मूर्खपणा आहे? खरोखरच, हा निव्वळ हास्यास्पद प्रकार आहे. ‘NEET’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाची मदत घ्यावी लागत असेल, तर हे काही भक्कम सुरक्षेचे लक्षण नव्हे; उलट, ही पूर्णपणे कोलमडलेल्या परीक्षा पद्धतीचा जिवंत पुरावा आहे. ‘NEET’ पेपरफुटी केवळ प्रश्नपत्रिकांची वाहतूक करणारे ट्रक असुरक्षित आहेत म्हणून होत नाही. तर, या गळतीचे मूळ व्यवस्थेतील खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचारात आहे. यात व्यवस्थेतीलच काही लोक सामील आहेत. प्रशासन व संपूर्ण व्यवस्थेमध्येच उत्तरदायित्वाचा (accountability) पूर्ण अभाव आहे, म्हणूनच ही पेपरफुटी होत आहे.
‘NEET’ परीक्षेच्या व्यवस्थापनासाठी हवाई दलाचा वापर करणे हा केवळ मूळ समस्येवरून लक्ष विचलित करण्यासाठी रचलेला एक देखावा आहे. भाजपचे निष्ठावान समर्थक आणि काही विशिष्ट पत्रकार या मूर्खपणाचे किती उत्साहाने समर्थन करतील, याची मी सहज कल्पना करू शकतो. भारतीय हवाई दलाचे अस्तित्व हे देशाच्या सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आहे. भाजपचा नाकर्तेपणा आणि शिक्षण मंत्रालयाला ग्रासून टाकणाऱ्या खोलवर रुजलेल्या भ्रष्टाचाराची उणीव भरून काढण्यासाठी नव्हे.
धर्मेंद्र प्रधान यांना याची लाज वाटली पाहिजे. 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि करिअर धोक्यात घातल्यानंतर राजीनामा देण्याऐवजी, ते जनतेचे लक्ष मूळ समस्येवरून हटवण्यासाठी केवळ अशा मूर्खपणाच्या कृत्यांमध्ये मग्न आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारचे कान टोचताना म्हटले आहे.