![]()
सेनगाव ते गोरेगाव मार्गावर सेनगाव पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून याप्रकरणी दोन जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्हयात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी पोलिस विभागाने कंबर कसली असून स्थानिक १३ पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहे. या पथकांना दररोज किती वाहनांवर कारवाई केली, किती ठिकाणी तपासणी करण्यात आली याचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून दररोज वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, सेनगाव ते गोरेगाव मार्गावर अवैधरित्या वाळू उपसा करून टिप्परद्वारे वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाली होती. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक नागनाथ पाटील, जमादार सुभाष चव्हाण, एकनाथ राठोड, यांच्यासह पोलिसांच्या पथकाने हॉटेल रानमाळा समोर थांबवून वाहनांची तपासणी सुरु केली होती. यावेळी पोलिसांनी एक टिप्पर थांबवून चालक सुरेश मुंढे (रा. पिंपळदरी, जि. परभणी) याची चौकशी केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे वाळू वाहतूक करण्याबाबत कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी टिप्पर व वाळू असा ७.१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सेनगाव पोलिस ठाण्यात आणला. या प्रकरणी उपनिरीक्षक नागनाथ पाटील यांच्या तक्रारीवरून सेनगाव पोलिसांनी टिप्पर चालक सुरेश मुंढे, कैलास खाडे (रा. सेनगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जमादार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
Source link
सेनगाव पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले:दोन जणांवर गुन्हा दाखल; 7.10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त