Headlines

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी दुर्दैवी:एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, जरांगेंनाही दिला ‘सकारात्मक भूमिके’चा सल्ला




शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे,’ अशी टीका शिंदे यांनी केली. तसेच शिवसेना पक्षाची घटना, लोकशाही आणि निवडणूक आयोगाचे अधिकार या सर्व बाबींचा विचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेनेच्या न्यायालयीन लढाईपासून मराठा आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, धनुष्यबाणाचे चिन्ह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विरोधकांची टीका आणि देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. शिवसेनेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची भूमिका शिवसेना पक्षाच्या संदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे म्हणाले की, संबंधित वकिलांनी युक्तिवाद करताना काही प्रश्न उपस्थित केले असतील तर ते त्यांचे काम आहे. मात्र, शेवटी पक्षाची घटना, देशाची घटना, लोकशाही आणि निवडणूक आयोगाचे अधिकार या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. शिवसेनेच्या वतीने आता या मुद्द्यांवर उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत काय भूमिका मांडली जाते, याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. ‘धनुष्यबाण गोठवण्याची मागणी अत्यंत दुर्दैवी’ धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याची मागणी केली जात असल्याबाबत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. धनुष्यबाण हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्मसन्मानाचा आणि श्रद्धेचा विषय असल्याचे ते म्हणाले. “धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना गोठवले, २०१९ मध्ये हिंदुत्वाला गोठवले, महाराष्ट्राच्या जनतेच्या मताला गोठवले, लोकशाहीला गोठवले आणि शिवसेनेच्या घटनेतही बदल केला, त्यांची भूमिका यावरून स्पष्ट होते,” असा घणाघात शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना आणि भूमिकेला महत्त्व देत पुढे जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मनोज जरांगेंना शिंदेंचा सल्ला; ‘सरकार सकारात्मक आहे, पण…’ मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही एकनाथ शिंदे यांनी सविस्तर भूमिका मांडली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी अनेक आंदोलने केली आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे शिंदे म्हणाले. “मी स्वतः गरीब मराठा शेतकरी कुटुंबातून आलो आहे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना, अडचणी आणि समस्या मला जवळून माहिती आहेत,” असे शिंदे यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला महायुती सरकारच्या काळात सुरुवात झाल्याचा दावा त्यांनी केला. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण मंत्रिमंडळात होतो, असे सांगत त्यांनी त्या काळातील निर्णयांचा उल्लेख केला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर ५,२०० अधिसंख्य पदांवर मराठा तरुणांना नोकरीची संधी देण्यात आली. सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि कर्जासाठी १० लाखांवरून १५ लाख रुपयांपर्यंतची सुविधा अशा विविध निर्णयांचा त्यांनी उल्लेख केला. कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेबाबतही सरकारने समित्या आणि आयोगांच्या माध्यमातून काम केले असल्याचे शिंदे म्हणाले. “इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. कायदेशीर आणि न्याय्य मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यायला हवी,” असे आवाहन त्यांनी केले. जरांगे यांच्या आंदोलनावर सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेण्यासाठी गेले असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मागण्यांबाबत सरकारकडून चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काळात सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेतून मार्ग निघतो का, याकडे आता लक्ष लागले आहे. मोदींच्या फोटोवरून मनसेच्या आंदोलनावर शिंदेंची प्रतिक्रिया मुंबईतील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मनसेने आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या फोटोला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या वापराबाबतही आक्षेप घेतले जात असल्याच्या प्रश्नावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत आदर करतात, असा दावा त्यांनी केला. नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रस्थापित करण्यात आल्याचा दाखला देत त्यांनी मोदींच्या शिवाजी महाराजांप्रती असलेल्या आदराचा उल्लेख केला. “निवडणुकीला सामोरे जाताना आणि सरकार स्थापन करतानाही नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला आहे,” असे शिंदे म्हणाले. मात्र, कोणता फोटो कुठे लावण्यात आला होता आणि त्याचा संदर्भ काय होता, हे पाहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना करणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. सरकारी कार्यालये आणि विमानतळांसारख्या ठिकाणी राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या छायाचित्रांसाठी प्रोटोकॉल असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. दिल्ली दौऱ्यामागे पक्षाच्या बैठका आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आपल्या दिल्ली दौऱ्याचे कारणही शिंदे यांनी स्पष्ट केले. राज्यातील बैठका आणि पक्षाच्या कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते दिल्लीत आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत प्रत्येकाला भेटणे शक्य नसल्याने आपण स्वतः दिल्लीत आलो, असे ते म्हणाले. याशिवाय शिवसेना पक्षाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असल्याने पक्षाचे वरिष्ठ वकील न्यायालयात बाजू मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर वकिलांशी आणि पक्षाच्या राज्यप्रमुखांशी चर्चा करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. शिवसेनेच्या वकिलांनी यापूर्वी दोन वेळा मुंबईत येण्याचा प्रयत्न केला होता; मात्र आपल्या व्यस्ततेमुळे त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत न्यायालयीन प्रकरणाचा आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७.८ टक्के जीडीपीवरून मोदींचे कौतुक भारताच्या ७.८ टक्के जीडीपी वाढीवरूनही शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे कौतुक केले. जगातील अनेक भागांत युद्धजन्य परिस्थिती असून अनेक देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत असताना भारताची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे ते म्हणाले. “७.८ टक्के जीडीपी हा देशासाठी गौरवाचा विषय आहे. भारत आर्थिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे,” असे शिंदे म्हणाले. विरोधकांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचे स्वागत करायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत २०४७ आणि भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेषतः शिवसेना पक्षासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका याबाबत त्यांच्या वक्तव्यांकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *