Headlines

राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाजपच्या टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर:गोपाळ तिवारी म्हणाले, भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, विरोधकांना चिरडू नये




‘भाजप सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. सत्तेच्या माजातून विरोधकांना चिरडण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी करू नये. जनता सुज्ञ असून योग्य वेळी भाजपला धडा शिकवेल,’ असा इशारा काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुण्यातील ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावर भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना तिवारी बोलत होते. यावेळी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष थोरवे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सौरभ अमराळे, साहेबराव क्षीरसागर, कुणाल राजगुरू आणि घनश्याम निम्हण उपस्थित होते. राहुल गांधी यांनी पुण्यात घेतलेला ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाला ‘झूठ की गुंज’ म्हणणे चुकीचे आहे, असे तिवारी यांनी सांगितले. पुण्यातील विविध महाविद्यालयांतील तब्बल 2 लाख 76 हजार विद्यार्थ्यांनी कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. त्यामुळे केवळ काँग्रेसवर टीका करणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बौद्धिक दिवाळखोरी असल्याची टीका त्यांनी केली. या कार्यक्रमात काँग्रेसचा झेंडा किंवा पक्षाच्या घोषणा कुठेही नव्हत्या. तरीही भाजपकडून पैसे देऊन ‘इन्फ्लुएन्सर’ आणल्याचे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे तिवारी म्हणाले. ‘विरोधक हे जनतेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सरकारने विरोधकांशीही जबाबदारीने वागण्याची गरज आहे,’ असे ते म्हणाले. भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा होऊन त्यावर काही ठोस उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण बैठकीत राहुल गांधी यांनाच लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप तिवारी यांनी केला. नीट आणि एमपीएससी परीक्षांमधील पेपरफुटी, महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी आत्महत्या आणि वाढता कर्जबाजारीपणा या प्रश्नांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणतेही ठोस उत्तर दिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बळजबरीने डांबून ठेवण्यात आल्याचा आरोपही तिवारी यांनी केला. सरकार जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी ठराविक व्यावसायिकांच्या हितासाठी राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगत तिवारी म्हणाले की, राहुल गांधी यांच्या विचारांमध्ये सर्वधर्मसमभाव आणि सर्वसमावेशक राजकारण आहे. मात्र, सत्ताधारी दुटप्पी आणि कुटनीतीचे राजकारण करत आहेत. पूर्वी राजकारणात मतभेद होते; मात्र मनभेद नव्हते. आता राजकीय वातावरण बदलल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 31 खासदार भाजपविरोधात निवडून आले आहेत, याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असेही तिवारी म्हणाले. राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंडमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचे गांभीर्य राखून तथ्यांवर आधारित राजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *