![]()
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर २०१६ मध्ये, तसेच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १६ सप्टेंबर २०२३ रोजी आणि त्यापूर्वी वेळोवेळी विविध सरकारांनी छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन अनेक विकासकामांच्या घोषणा केल्या होत्या. या घोषणांपैकी प्रत्यक्षात किती कामे झाली, किती कामे सुरू झाली आणि किती कामे अद्याप रखडली आहेत, याची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ‘मराठवाड्याचा विकास, तुम से ना हो पायेगा!’ या घोषवाक्याखाली १ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२६ दरम्यान मराठवाडाव्यापी जनआंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना नेते, आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना भवन, मुंबई येथे पत्रकार परिषदेत केली. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्याच्या विकासासाठी तसेच विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. या घोषणांपैकी प्रत्यक्षात किती कामे सुरू झाली, किती पूर्ण झाली आणि किती कामे अद्याप रखडली आहेत, याचा हिशोब जनतेसमोर मांडण्याची या आंदोलनाची प्रमुख भूमिका आहे. ३ सप्टेंबर २०२६ रोजी ‘डेव्हलपमेंट डिलेड.. डेव्हलपमेंट डिनाईड’ या संकल्पनेअंतर्गत शिवसेना नेते आमदार – माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सरकारच्या घोषणांचे छत्रपती संभाजीनगरात सादरीकरण करणार आहे. या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलेल्या प्रकल्पांची सद्यस्थिती, रखडलेली कामे, अपूर्ण प्रकल्प आणि सरकारच्या घोषणांची अंमलबजावणी यांची वस्तुस्थिती मांडण्यात येणार आहे. यानंतर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार परिषद, तालुकास्तरावर तहसीलदारांच्या भेटी, रखडलेल्या व अपूर्ण विकासकामांची पाहणी, जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर आंदोलने आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. या जनआंदोलनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या आठही जिल्ह्यांमध्ये स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्याच्या विकासप्रश्नांवर चर्चा करण्यात येईल. दुपारी २ वाजता आणि ३ वाजता जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. शनिवार, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आणि ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा मुख्य ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आणि ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. दुपारी ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता लातूर जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा मुख्य ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता आणि ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथे जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा मुख्य ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असून, या आंदोलनाला खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. दुपारी ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता हिंगोली जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा मुख्य ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परभणी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. दुपारी ४ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता परभणी जिल्हा विकासाच्या प्रश्नांवर जिल्हा मुख्य ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजता जिल्हाधिकाऱ्यांसमवेत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर दुपारी ३ वाजता अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुकाप्रमुखांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी तहसीलदारांची भेट घेणार आहेत. मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्ह्यातील अपूर्ण विकासकामांची पाहणी करण्यात येणार असून, त्यानंतर दुपारी २ वाजता आणखी एका अपूर्ण विकासकामाची पाहणी करण्यात येणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशी, १७ सप्टेंबर २०२६ रोजी, छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या विकासाच्या प्रश्नांवर मराठवाडा व्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. त्यानंतर मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर विभागीय आयुक्तांची भेट घेऊन सरकारकडे प्रलंबित विकासकामांचा आणि मंत्रिमंडळाच्या घोषणांच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात येणार आहे.
Source link
‘मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा!’:शिवसेना ठाकरे गटाचे मराठवाडाव्यापी जनआंदोलन, अंबादास दानवेंनी दिली माहिती