Headlines

माजी नक्षल कमांडर भूपती गोंडवाना विद्यापीठात समन्वयक:आदिवासी ग्रामस्थांना घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देणार




एकेकाळी गडचिरोलीच्या घनदाट जंगलात नक्षलवादी कमांडर म्हणून सक्रिय असलेला मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२५ मध्ये पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या भूपतीची गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी तो आता काम करणार आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे यांनी या नियुक्तीला अधिकृत दुजोरा दिला असून, भूपती यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. भूपती गोंडवाना विद्यापीठाच्या ‘एकल’ या विशेष प्रकल्पांतर्गत प्रशासकीय समन्वयक म्हणून काम पाहतील. आदिवासी ग्रामस्थांना त्यांच्या घटनात्मक अधिकारांची जाणीव करून देणे, तसेच ग्रामसभा आणि गावकऱ्यांना ‘पेसा’ (पंचायत राज विस्तार कायदा) आणि वनहक्क कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणे हे त्यांच्या कामाचे प्रमुख स्वरूप असेल. ही नियुक्ती सुरुवातीला तीन महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर असून, त्यांना दरमहा ३० हजार रुपये मानधन दिले जाईल. ग्रामस्थ, ग्रामसभा आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्यात सुयोग्य समन्वय साधून आदिवासींच्या विकासातील प्रशासकीय अडथळे दूर करण्यासाठी भूपती यांची मदत होणार आहे. हिंसेचा मार्ग सोडून संविधानाच्या चौकटीत आदिवासी बांधवांचा विकास साधण्यासाठी ते आता प्रयत्न करतील. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूपती यांना आदिवासींच्या समस्यांची सखोल जाण आहे. अनेक दशके जंगलात वावरल्याने त्यांना तिथल्या भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीची पूर्ण माहिती आहे. भूपती यांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून, विद्यापीठातील मुलाखतीदरम्यान त्यांनी ‘पेसा’ आणि वनहक्क कायद्याबद्दल सविस्तर माहिती दिली होती. त्यांच्या याच ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. एकेकाळी हिंसेचा मार्ग अवलंबलेला हा माजी नक्षलनेता आता शिक्षणाच्या आणि संविधानाच्या माध्यमातून आदिवासींच्या हक्कासाठी काम करताना दिसेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *