Headlines

राहुल गांधींवरील गुन्ह्याविरोधात पुण्यात काँग्रेसचे आंदोलन:हल्दवानी येथील कारवाई राजकीय सूडबुद्धीतून झाल्याचा आरोप




लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात उत्तराखंडमधील हल्दवानी येथे दाखल करण्यात आलेल्या कथित द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने मंगळवारी बालगंधर्व चौकातील झाशीची राणी पुतळ्यासमोर आंदोलन केले. पुणे महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्दवानी येथील सभेनंतर सभास्थळी कथित ‘शुद्धीकरण विधी’ करण्यात आल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भूमिका घेतली होती. या कृत्यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. मात्र, संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी उत्तराखंड पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीतून करण्यात आल्याचा आरोप करीत, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना चंदूशेठ कदम म्हणाले की, ‘‘संविधानात अंतर्भूत असलेल्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. राज्य पुरस्कृत दडपशाहीच्या कारवायांनी काँग्रेसला घाबरवता येणार नाही. प्रत्येक नागरिकाच्या सामाजिक न्याय, घटनात्मक समानता आणि प्रतिष्ठेसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने संघर्ष करीत राहील.’’ मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करणे ही जातीयवादी मानसिकतेची पराकाष्ठा असल्याचा आरोपही कदम यांनी केला. हा केवळ खर्गे यांचा नव्हे, तर देशातील दलित, वंचित आणि शोषित नागरिकांचा अपमान असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार दिला असून जात-पात आणि अस्पृश्यतेच्या मानसिकतेला खतपाणी घालणाऱ्या प्रवृत्तींविरोधात काँग्रेसचा लढा सुरू राहील, असेही ते म्हणाले. या आंदोलनात नगरसेवक साहिल केदारी, सुनील शिंदे, दीपाली डोख, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, शहर उपाध्यक्ष कैलास गायकवाड, महिला अध्यक्षा स्वाती शिंदे, युवक अध्यक्ष सौरभ अमराळे, इंटक अध्यक्ष चेतन अगरवाल, एनएसयूआय अध्यक्ष अभिजीत गोरे, अनुसूचित विभागाचे अध्यक्ष कुणाल राजगुरू यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *