![]()
वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा क्रिस्टाच्या धडकेत आठ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच या प्रकरणात आता आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. आरोपी महिला मेघा रावल यांना वाचवण्यासाठी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारावर दबाव आणण्यात आल्याचा आणि जबाब बदलण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्याचे सांगणारे संदीप सिंह यांनी हा आरोप केल्याने वांद्रे अपघातप्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. वांद्रे पश्चिमेतील जॉन बॅप्टिस्ट रोडवर रविवारी (30 ऑगस्ट) दुपारी हा भीषण अपघात झाला. आठ वर्षांचा अंश रविंद्र गुप्ता रस्त्याच्या कडेला जात असताना भरधाव इनोव्हा क्रिस्टाने त्याला धडक दिली. धडकेनंतर कारचे चाक अंशच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. खेळायला घराबाहेर पडला, पण परतलाच नाही अंश तिसरीत शिकत होता. रविवारी तो घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. सेंट अँड्र्यू चर्चजवळील परिसरातून तो जात असताना जॉन बॅप्टिस्ट रोडवर हा अपघात झाला. अंश हा गुप्ता कुटुंबीयांचा एकुलता एक मुलगा होता. तब्बल 15 वर्षांनंतर कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे येत्या 2 सप्टेंबरला त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या अवघ्या काही दिवस आधी त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताच्या वेळी कार एक महिला चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महिला वाहन चालवताना मोबाईलवर बोलत असल्याचा दावा संदीप सिंह यांनी केला आहे. त्यामुळे चालकाचे लक्ष विचलित झाले असावे, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. साक्षीदाराला पैशांची ऑफर दिल्याचा आरोप दरम्यान, अंशच्या मृत्यूच्या तपासाला आता वेगळे वळण मिळाले आहे. अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा करणारे संदीप सिंह यांनी रावल कुटुंबीयांकडून आपल्याशी संपर्क साधण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपला जबाब बदलण्यासाठी आणि या प्रकरणाबाबत गप्प राहण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. सिंह यांच्या या आरोपामुळे पोलिसांसमोर आता नवा प्रश्न निर्माण झाला आहे. साक्षीदारावर दबाव आणण्याचा किंवा त्याचा जबाब बदलण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न झाला का, पैशांची ऑफर कोणी आणि कोणत्या माध्यमातून दिली, तसेच या प्रकारामागे नेमके कोण होते, याचा तपास होणे महत्त्वाचे ठरणार आहे. मेघा रावलला अटक या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी मेघा रावल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 105, 281 आणि 125 तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम 184 अंतर्गत कारवाई केली आहे. कारचा वेग, चालकाचे लक्ष विचलित झाले होते का आणि अपघाताची नेमकी परिस्थिती काय होती, याचा तपास सुरू आहे. आरोप खरे ठरल्यास पुढे काय? साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांविरोधात स्वतंत्र कायदेशीर कारवाई होऊ शकते. मात्र, सध्या संदीप सिंह यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पडताळणी होणे बाकी आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासानंतरच या आरोपांमागील सत्य स्पष्ट होणार आहे. एका आठ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने आधीच हादरलेल्या गुप्ता कुटुंबासाठी या प्रकरणातील प्रत्येक घडामोड महत्त्वाची ठरत आहे. आता अंशच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या परिस्थितीबरोबरच साक्षीदारावर दबाव आणल्याच्या आरोपांची पोलिस चौकशी किती पुढे जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस:जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार, जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील 11व्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती खालवली आहे. जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून रात्री मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत डॉक्टरांशी चर्चा केली. जरांगे पाटलांनी उपचारासाठी नकार दिला आहे.सविस्तर वाचा..
Source link
वांद्रे अपघात प्रकरण:आरोपी महिलेकडून साक्षीदाराला विकत घेण्याचा प्रयत्न, चिमुकल्या अंशचा झाला होता मृत्यू