![]()
पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मनसैनिकांनी व अमित ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान मोदींचा फोटो तिथून काढला. त्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. अमित ठाकरे यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाने त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानासमोर आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्या ठिकाणी मनसैनिक मोठ्या प्रमाणात जमल्याचे दिसून येत आहे. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना आव्हानही दिले आहे. त्याच वेळी महिममध्ये भाजप युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णराज महाडिक पोहोचल्यानंतर त्यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर मनसैनिकही तिथे पोहोचल्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचे काम केले. आम्ही त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ- संदीप देशपांडे अमित ठाकरेंच्या कृत्यानंतर भाजप युवा मोर्चा आक्रमक झाला असून त्यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी आंदोलन करण्याची घोषणा केली. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेचे कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी थेट शिवतीर्थाकडे धाव घेतली. मनसे नेते संदीप देशपांडे, गजानन काळे आणि अविनाश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तिथे एकत्र येत भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. यावेळी थेट इशारा देताना, “भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी यावं, आम्ही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ,” असे संदीप देशपांडे म्हणाले. दरम्यान, मनसैनिक आणि भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आमने-सामने येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या रस्त्याची वाहतूक बंद करण्यात आली आहे. नेमका वाद कशामुळे पेटला? अमित ठाकरे यांनी पुणे येथील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालात जाऊन विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी केली. मात्र यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावल्याचे दिसून आले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी यावर आक्षेप घेत तो फोटो तिथून काढण्यास सांगितले. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत तो फोटो तिथून काढला. या प्रकारामुळे भाजप आणि मनसेमध्ये वाद निर्माण झाला आहे. तसेच या प्रकारानंतर अमित ठाकरे आणि मनसेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
Source link
माहिममध्ये भाजप-मनसेचा राडा!:अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवल्याने भाजप आक्रमक; त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ- संदीप देशपांडे