![]()
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावे, या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात शिक्षकांच्या तब्बल 2 हजार 657 जागा रिक्त आहेत. यामध्ये प्राथमिक व पदवीधर शिक्षक संवर्गातील 471 पदे, माध्यमिक विभागातील 2 हजार 54 पदे आणि प्राथमिक विभागातील मुख्याध्यापकांची 132 पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सर्वाधिक परिणाम होत असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला आहे. 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम? उपोषणादरम्यान बोलताना निलेश लंके यांनी शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. एका शिक्षकामागे सरासरी 20 विद्यार्थ्यांचा विचार केल्यास, सध्या रिक्त असलेल्या पदांमुळे 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक शाळांमध्ये उपलब्ध शिक्षकांनाच एकापेक्षा अधिक वर्गांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देता येत नसून अध्यापनाच्या गुणवत्तेवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षकांची संख्या आधीच अपुरी असताना कार्यरत शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामांची जबाबदारी टाकली जात असल्याचा मुद्दाही लंके यांनी उपस्थित केला. बीएलओ ड्युटी, मतदार यादी पुनरीक्षण, जनगणनेशी संबंधित कामे, विविध शासकीय सर्वेक्षणे, ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरणे, आधार व बँक खात्यांच्या नोंदी, पोषण आहार तसेच आरोग्यविषयक माहिती संकलित करण्यासारखी अनेक कामे शिक्षकांकडे सोपवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘शिक्षकांचा वेळ अध्यापनाऐवजी कागदोपत्री कामांत’ या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांचा मोठा वेळ विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि कागदोपत्री कामांमध्ये खर्च होत असल्याचे लंके यांनी म्हटले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम होत असल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरावीत, भरती प्रक्रियेसाठी निश्चित मुदतीचा कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा आणि शाळानिहाय रिक्त पदांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी, अशा प्रमुख मागण्या लंके यांनी केल्या आहेत. यासोबतच शिक्षकांना अशैक्षणिक कामांच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना केवळ अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, अशीही त्यांची मागणी आहे. शिक्षकांच्या हजारो रिक्त पदांचा प्रश्न आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा परिणाम यामुळे खासदार निलेश लंके यांच्या उपोषणाने अहिल्यानगरच्या शैक्षणिक व्यवस्थेतील गंभीर समस्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हेही वाचा.. माहिममध्ये भाजप-मनसेचा राडा!:अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवल्याने भाजप आक्रमक; त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ- संदीप देशपांडे पुण्यातील शासकीय तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुविधांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे पोहोचले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे दिसून आले होते. त्यानंतर मनसैनिकांनी व अमित ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत पंतप्रधान मोदींचा फोटो तिथून काढला. त्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे.सविस्तर वाचा..
Source link
खासदार निलेश लंके यांचे उपोषण:अहिल्यानगर जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांचा दुष्काळ, 2,657 रिक्त पदांचा प्रश्न ऐरणीवर