![]()
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी आता राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे की, लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मराठे थेट मुंबईत दाखल होऊन आंदोलन करतील. या पार्श्वभूमीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छात्रपटी संभाजीनगर येथे अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन केले असून, या बैठकीच्या नंतरच मनोज जरांगे यांना भेटायला जायचे की नाही ते ठरवले जाणार असल्याचे सांगितले आहे. पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आता आम्ही आधी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करू. त्याचा आढावा घेऊन मग निर्णय घेतला जाईल. अजून मनोज जरांगे यांची भेट घेण्याचे काही निश्चित केले नाही. फक्त सुरुवातीला आमचा प्राथमिक आढावावर चर्चा होईल. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत अधिकाऱ्यांसोबत आणि त्यानंतर अंतरवाली सराटीला जायचे की नाही ते ठरवणार असल्याचे विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे. आंतरवाली सराटी येथे कधी जाण्याचा निर्णय घेतला आहे? असा प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अजून काही मी तिकडे जाण्याचा विचार नाही केलेला. जोपर्यंत जे काही मुद्दे उपस्थित केले गेले आहेत, आणि आम्ही त्यांना जे मुद्दे पाठवले आहेत, जी माहिती पाठवली आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आम्ही काही करू शकत नाही. शेवटी हा प्रश्न चर्चा करूनच सुटणारा आहे. आता त्यांनी जे काही दोन-तीन मुद्दे उपस्थित केले आहेत, त्यावरच आमची चर्चा होणार आहे. सगळ्या अधिकाऱ्यांना बोलावले आहे आणि आता त्यांच्यासोबत चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटीकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली होती. मात्र यावर त्यांनी थेट उत्तर देत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Source link
'अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर निर्णय घेऊ':मनोज जरांगेंच्या भेटीला जात असल्याच्या चर्चेला मंत्री राधाकृष्ण विखे पटलांकडून पूर्णविराम, नेमके काय म्हणाले?