![]()
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह तसेच शिवराळ भाषेचा वापर असलेली व्हिडिओ क्लिप पोस्ट केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडिया अकाउंटवरून मंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे माजी नगरसेवक सुनील पांडे (वय 56, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी रीलस्टार संतोष पंडित आणि त्याच्या एका साथीदाराविरोधात कारवाई सुरू केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील ‘राजकारण एक्सप्रेस’ या अकाउंटवरून चंद्रकांत पाटील यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये लोकप्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात, असा दावा करत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, या टीकेसोबतच अश्लील, शिवराळ आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. या व्हिडिओमुळे मंत्र्यांची जाणीवपूर्वक बदनामी होत असल्याचा आरोप करत सुनील पांडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित सोशल मीडिया अकाउंट, व्हिडिओ आणि तो प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची माहिती तपासण्यास सुरुवात केली. या प्रकरणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा असभ्य भाषा वापरणे, बदनामी करणे आणि संबंधित कृत्यात सामूहिक सहभाग असल्याच्या आरोपांनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 356, 296 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय नेते, लोकप्रतिनिधी किंवा सार्वजनिक व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ प्रसारित करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात व्हिडिओ नेमका कोणी तयार केला, तो कोणत्या उद्देशाने तयार करण्यात आला आणि तो सोशल मीडियावर कोणी व कशा पद्धतीने प्रसारित केला, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एस. जाधव करत आहेत. तपासादरम्यान संबंधित सोशल मीडिया अकाउंटची माहिती, व्हिडिओची सत्यता आणि त्याच्या प्रसारामागील भूमिका तपासली जाणार आहे. हेही वाचा.. MPSC पेपरफुटीत गौरवनंतर ऋतुजा पाटीललाही अटक:’प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, दुसऱ्या तक्रारदाराचा गंभीर आरोप राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणात ‘प्रेमाचा अँगल’ असल्याचे सांगून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणाची तक्रार करणाऱ्या ऋषिकेश गांगुर्डे याने हा दावा केला असून, मूळ पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटला वेगळे वळण देण्याचा हा प्रकार असल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा..
Source link
चंद्रकांत पाटलांविरोधात आक्षेपार्ह रील:संतोष पंडितसह दोघांवर गुन्हा, शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप