Headlines

अंबानगरीत दिवसभर विठूनामाचा गजर, मंदिरे हाऊसफुल्ल:पटवीपुऱ्यातील प्राचीन मंदिरात भाविकांची लांबच लांब रांग




आषाढी एकादशीनिमित्त अमरावती शहर आणि जिल्ह्यात शनिवारी विठ्ठल रुक्मिणीच्या नामाचा अखंड गजर आणि टाळ-मृदंगाचा नाद घुमला. भाविकांच्या अलोट उत्साहाने संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले होते. शहरातील प्रमुख विठ्ठल मंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. पटवीपुरा-बुधवारा येथील प्राचीन विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विठूरायाच्या दर्शनासाठी प्रत्येक भाविकाला किमान अर्धा तास प्रतीक्षा करावी लागत होती. भल्या पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी दिसून आली. शहराच्या विविध भागांतून रथारूढ विठ्ठल-रुक्मिणीच्या मनमोहक पालख्या आणि भव्य दिंड्या काढण्यात आल्या. “ज्ञानबा तुकाराम” आणि “जय हरी विठ्ठल”च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता. अबालवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वच जण भक्तीच्या रंगात रंगून गेले होते. पटवीपुरा मंदिराप्रमाणेच नवाथे प्लॉट येथील मंदिरातही दिवसभर विठ्ठल भक्तांची वर्दळ होती. गोपालनगर, साईनगर, महावीरनगर, विजयपथ नगर, सिपना महाविद्यालय परिसर, यमुना हाऊसिंग सोसायटी आणि गायत्रीनगर येथील नागरिकांनी पवार यांच्या प्रसिद्ध वाडीतील विठ्ठल मंदिरात पांडुरंगाची मनोभावे पूजा केली. तीन-चार वर्षांपूर्वी येथे विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर बांधण्यात आले असून, ही बाग पूर्वी गुलाबाची बाग म्हणून ओळखली जात होती. काही भागांमध्ये विठ्ठल भक्तीत लीन झालेल्या भाविकांनी दिंड्या आणि पालख्या काढून आनंदोत्सव साजरा केला. श्यामनगर आणि राजेंद्र कॉलनी परिसरात दुपारनंतर स्थानिकांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या रथारूढ मूर्तींसह पालखी काढली. यामध्ये डोक्यावर तुळस घेतलेली चिमुकली, पावली करत चालणाऱ्या महिला आणि विठ्ठल नामाचा गजर करत भक्तीत तल्लीन झालेले नागरिक असे चित्र होते. काही ठिकाणी हरिनामाचा सप्ताह आणि महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *