Headlines

मेळघाटातील कुपोषण नियंत्रणासाठी उपाययोजना करणार:महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची ग्वाही




मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांमधील कुपोषणाचा प्रश्न गंभीर असून, राज्य शासन यावर सकारात्मक पाऊले उचलत आहे. गेल्या काही काळात कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. येत्या काळातही माता आणि बाल संगोपनासाठी विविध उपाययोजना करून मेळघाटातील कुपोषण नियंत्रित करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. धारणी येथील तहसील कार्यालयात मेळघाटातील विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी भाजपचे प्रभुदास भिलावेकर, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, महिला बालविकास उपायुक्त विलास मसराळे आदी उपस्थित होते. मंत्री तटकरे यांनी सांगितले की, मेळघाटात काही प्रमाणात बालविवाहाची समस्या आहे. यामुळे कमी वयात मातृत्व येत असल्याने कुपोषित बालके जन्माला येण्याची शक्यता वाढते. यावर उपाययोजना म्हणून बालविवाहाबरोबरच मातांना पोषक आहाराचे मार्गदर्शन करण्यासाठी महिला सेविकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या सेविकांमार्फत आदिवासींना समजेल अशा भाषेत आरोग्यविषयक माहिती दिली जाईल. तसेच, बाळ जन्माला आल्यानंतर एक हजार दिवसांच्या आहाराचे नियोजन करण्यात येणार आहे. शासनाच्या या उपाययोजनांमुळे कुपोषित बालके जन्माला येण्यापासून बचाव होण्यास मदत होईल. मेळघाटातील अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी विजेच्या सोयीसाठी सोलार, स्वच्छतागृह आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. गरोदर मातांना देण्यात येणारा आहार त्यांनी त्याच ठिकाणी घ्यावा, यासाठी प्रयत्न केले जातील. दर्जेदार आहार मिळण्यासाठी आहार समिती सक्रिय करावी आणि यामध्ये समाजातील विविध घटकांचा समावेश करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. आदिवासींच्या मनात आरोग्य यंत्रणेबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतींमध्ये नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी प्रयत्न केले जातील, ज्यामुळे आदिवासींना सिझेरियनची असणारी भीती कमी होण्यास मदत होईल. महिला आणि आदिवासींसाठी असलेल्या योजनांची माहिती ग्रामसभेतून देण्यात यावी. महिलादिनी होणाऱ्या ग्रामसभेत प्रामुख्याने महिलांच्या योजनांची माहिती सांगावी, असेही त्यांनी नमूद केले. मेळघाटातील कुपोषणाच्या बाबतीत मध्यम तीव्र कुपोषण आणि गंभीर तीव्र कुपोषण हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत. मध्यम तीव्र कुपोषण जरी कमी असले तरी त्यात सुधारणा करण्यात यावी. गंभीर तीव्र कुपोषणाची आकडेवारी १०० च्या आत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या दौऱ्यादरम्यान मंत्री तटकरे यांनी भोकरबर्डी, धुळघाट, कळमखार, लवादा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट दिली. त्यांनी बालके आणि आदिवासी समूहाशी संवाद साधला. जिल्हा नियोजनच्या निधीमधून अंगणवाडी बांधकामासाठी मिळणारा निधी एक वर्षाच्या आत खर्च करावा. खर्च करणे शक्य नसल्यास बांधकाम विभागाला एजन्सी म्हणून नेमून कामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *