![]()
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शिक्षण संस्था, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी ‘अभ्यासनाट्य’ चळवळ एकत्रित प्रयत्नांनी पुढे न्यावी, असे आवाहन केले आहे. शालेय अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाच्या आकलनासाठी ही चळवळ उपयुक्त आणि प्रभावी असून, या माध्यमातून वर्तन परिवर्तनाचे उद्दिष्ट परिणामकारकरीत्या साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले. यावेळी प्रकाश पारखी लिखित ‘शालेय नाट्यसंस्कार’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभ्यासनाट्य या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमात डॉ. जोशी बोलत होते. पुणे येथील सदाशिव पेठेतील पेरूगेट भावे स्कूलमधील प्र. ल. गावडे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सुधीर काळकर, शिक्षण अभ्यासक ज्योती केमकर, नाट्यसंस्कारच्या विश्वस्त दीपाली निरगुडकर आणि संध्या कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते. नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक वर्षे पुण्यात आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धांचे आयोजन करत आहे. यावर्षी या स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणार असून, जास्तीत जास्त शाळांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. डॉ. न. म. जोशी यांनी प्रकाश पारखी यांच्या अभ्यासनाट्य संकल्पनेचे कौतुक केले. ते म्हणाले की, पारखी यांनी ही संकल्पना शाळाशाळांमध्ये चळवळ स्वरूपात पुढे नेली आहे, जी शैक्षणिक अभ्यासक्रमात उपयुक्त आणि प्रभावी ठरत आहे. या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी शैक्षणिक सिद्धांतांचे सुगम आणि प्रात्यक्षिक दाखवले आहे, ते पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष सुधीर काळकर म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतीय ज्ञानप्रणालीअंतर्गत नाटक आणि अभिनय हे केवळ मनोरंजन नसून, विद्यार्थ्यांमधील कृतीशीलता जागवणारे मार्ग आहेत. नाट्यसंस्कारच्या या उपक्रमातून विद्यार्थी विषय तर समजून घेतीलच, पण सभाधीटपणा, उच्चारांची अचूकता, प्रसंगावधान, पाठांतरकौशल्य आणि संवाद साधण्याची कला यांसारखी अनेक कौशल्येही आत्मसात करतील, जी त्यांना भावी आयुष्यात उपयुक्त ठरतील. शिक्षण अभ्यासक ज्योती केमकर यांनी ‘शालेय नाट्यसंस्कार’ या पुस्तकाचे विविध भाषांमध्ये अनुवाद होण्याची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची गोडी कमी होत असताना, अभ्यासनाट्याद्वारे ती पुन्हा निर्माण करणे शक्य आहे. नाटक ही कला केवळ स्नेहसंमेलनापुरती न ठेवता, नित्य गोष्ट म्हणून पुढे आल्यास प्रत्येक विषय विद्यार्थ्यांना नेमकेपणाने समजण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या. प्रकाश पारखी यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘वर्गनाट्यगृहा’ची संकल्पना आणि अभ्यासनाट्य कार्यशाळांची व्याप्ती राज्यभर वाढविण्याची गरज प्रतिपादन केली. या उपक्रमाला चळवळ आणि अभियानाचे रूप मिळावे, विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आणि व्यक्तिमत्त्वविकासाची संधीही मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
Source link
अभ्यासनाट्य चळवळ एकत्रितपणे पुढे न्या:डॉ. न. म. जोशींचे आवाहन; प्रकाश पारखींच्या 'शालेय नाट्यसंस्कार' पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन