Headlines

आरक्षणात एकाच्या ताटातील दुसऱ्याला देणार नाही:मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही




मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत स्पष्ट ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की, सध्याचे सरकार मराठी आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी सर्वाधिक निर्णय घेत आहे. कोणत्याही समाजात मतभेद निर्माण करण्याचे काम सरकारने केलेले नाही. आरक्षणाच्या प्रश्नावर एकाच्या ताटातील दुसऱ्याच्या ताटात देण्याचा प्रश्नच नाही आणि कोणत्याही समाजावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत बोलत होते. ही बैठक गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, माजी मंत्री रावसाहेब दानवे, अमित साटम, भारती पवार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, आशिष शेलार, चित्रा वाघ, राजेश पांडे यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाखाली झालेल्या निवडणुकांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या निवडणुकांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, महायुतीवर जनतेचा विश्वास असल्याचे यातून दिसून येते. गणेशोत्सवातील डीजेच्या मुद्द्यावर प्रसारमाध्यमे सातत्याने भूमिका विचारत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पुणे हे असे शहर आहे, जे कोणत्याही वादात न पडता पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा केला जातो, हे देशाला दाखवून देईल, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’वर जोरदार टीका केली. देशाच्या विकासाची घोडदौड थांबवण्यासाठी विविध शक्ती कार्यरत असून, विरोधकांकडून समाजात संभ्रम आणि अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ भाजपविरोधी राजकारण न करता संविधानाच्या नावाखाली समाजात गैरसमज पसरवण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले. विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’चा मुकाबला करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नव्या कार्यपद्धतीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. राज्यातील १८ ते २६ वयोगटातील युवक-युवतींची मोठी संख्या लक्षात घेऊन, भाजप युवा मोर्चाने किमान दहा लाख युवा कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे उभारावे, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *