![]()
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात गोळेगाव येथे वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रवीण सुभाषराव चव्हाण (३७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली, जेव्हा ते शेतातून घरी परतत होते. कौटुंबिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण चव्हाण हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास शेतातील काम आटोपून घरी परत येत होते. त्याचवेळी अचानक पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण गोळेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण चव्हाण हे परिसरात एक कष्टाळू, होतकरू आणि प्रगतशील युवा शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या पत्नी शितल प्रवीण चव्हाण या गोळेगावच्या विद्यमान सरपंच आहेत. गावाच्या विकासकामांमध्ये आणि विविध सामाजिक, धार्मिक व सार्वजनिक उपक्रमांमध्ये दोघांचाही सक्रिय सहभाग होता. प्रवीण चव्हाण यांच्या अकाली निधनाने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे. गावातील नागरिक, विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
Source link
अमरावतीत वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा मृत्यू:दर्यापूर तालुक्यातील गोळेगाव येथील घटना