Headlines

अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट:8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांचे धक्कादायक दावे; बनावट खाती की मोठा घोटाळा?




नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास यंत्रणांनी गती वाढवली असून, या प्रकरणात संशयित म्हणून समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी आठ तास चौकशी केली. या दीर्घ चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना प्रतिभा चाकणकर यांनी अनेक महत्त्वाचे दावे केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले नाही किंवा त्या संस्थेत गेल्याच नाहीत. तसेच त्यांच्या नावाने दाखवण्यात आलेली माहिती आणि पत्ताही चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांचाही जबाब नोंदवण्यात आला. समता पतसंस्थेत त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर चार खाती असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. यापैकी दोन खाती प्रतिभा चाकणकर यांच्या नावावर तर दोन त्यांच्या मुलांच्या नावावर असल्याचे सांगितले जात आहे. या खात्यांमधून दोन कोटी रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहार झाल्याची बाबही उघडकीस आली आहे. त्यामुळेच पोलिसांनी दोघांची सखोल चौकशी करत सर्व तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेली खाती पूर्णपणे बनावट आहेत. त्या खात्यांवरील सह्या देखील त्यांच्या नसल्याचा त्यांनी दावा केला. मी एकही रुपयाची उलाढाल केलेली नाही. माध्यमांमधून बातम्या समजल्यावर आम्ही स्वतःहून जबाब देण्यासाठी आलो, असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय खाते उघडताना वापरण्यात आलेला पत्ताही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात त्यांच्या वकिलांनीही महत्त्वाची माहिती दिली. वकील जयश्री काळे-पालवे यांनी सांगितले की, प्रतिभा आणि तन्मय चाकणकर यांच्या नावाने उघडण्यात आलेली खाती संशयास्पद आहेत आणि त्यामध्ये बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याची शक्यता आहे. पोलिसांना सह्यांचे नमुने देण्यात आले असून तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. पुढील कायदेशीर कारवाईबाबत निर्णय चर्चा करून घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या धाग्यांवरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, खरात नॉमिनी असलेल्या सुमारे शंभर खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू याशिवाय आयकर विभागानेही नाशिकमधील काही ठिकाणी कारवाई करत संबंधित कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. मालमत्ता खरेदी-विक्री आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, खरातच्या संपत्तीचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्व घडामोडींमुळे अशोक खरात प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे बनले असून, पुढील काही दिवसांत या तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *