![]()
श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ, तेव्हाच श्रीकृष्ण त्यात आपले सुमधुर सूर भरतील, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रस्त्यावरील माऊली सांस्कृतिक भवन येथे इस्कॉनच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता अत्यंत उत्साहात झाली, याप्रसंगी आ. संग्राम जगताप, पार्वतीबाई अरुणकाका जगताप, इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी दास, वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, डॉ. सौ. अंजली फाटके, वंदना कानडे, मिना जग्गड, सोनाली चवंडके, मिलिंद चवंडके, अशोक कानडे आदी उपस्थित होते. आ. जगताप म्हणाले, इस्कॉनच्या वतीने अधिक महिन्याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ‘श्रीमद् भागवत कथा’ भाविकांची भक्ती भावना अधिक वृद्धिंगत करणारी ठरली आहे. संतांचे विचार आणि भगवंताचे नामस्मरण माणसाला जीवनाचा खरा मार्ग दाखवते. सोहळ्यादरम्यान यश गोडसे याने श्रीकृष्ण रूपात, तर गायत्री माणिक हिने रुक्मिणी रूपात कथास्थळी प्रवेश केला. या मनमोहक रूपांचे भाविकांनी पुष्पवृष्टी आणि जयजयकार करत उत्स्फूर्त स्वागत केले. या बालरूपांमुळे संपूर्ण मंडप भक्तीरसात न्हाऊन निघाला होता. भक्तिमय वातावरणात झालेल्या महाआरतीनंतर उपस्थित हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. शरणागती भगवंताचा मार्ग आपला श्वास सुरू आहे, आपण बोलू-ऐकू शकतो, ही केवळ श्रीकृष्णाचीच कृपा आहे. रावण आणि कंसासारख्या अहंकारी व्यक्तींना कधीच भगवंताचे दर्शन घडले नाही. आपण भगवंताकडे एक पाऊल टाकले, तर तो आपल्यासाठी शंभर पावले पुढे येतो. श्रीकृष्णाच्या गवळी सवंगड्यांनी स्वतःला भगवंताच्या स्वाधीन कसे करायचे, याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. भाविकांनी नामस्मरणाच्या बळावर या जन्माचे सार्थक करावे, असे आवाहन रेवतीनंदन दास यांनी केले.
Source link
अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता