![]()
माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी आंदेकर टोळीतील तीन आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कृष्णा आंदेकर, स्वराज वाडेकर आणि हर्षल वाडेकर अशी या आरोपींची नावे आहेत. या हल्ल्यात अक्षय ऊर्फ बाळू बापू म्हस्के (वय २६, रा. आंबेगाव पठार) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पत्नीने सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आंदेकर टोळीप्रमुख बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर, त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर, नातू तुषार निरंज वाडेकर, स्वराज निरंजन वाडेकर, अमित बहादूरकर आणि स्वप्नील बहादूरकर यांच्यासह अमन उर्फ लाला फारूख बागवाले, वेदांत श्रीनिवास टेमगिरे, आवेज आशपाक शेख, ऋषीप्रसाद मोहन आंबट, आफताब शरीफ सय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. हा हल्ला २० मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर येथील राजर्षी शाहू बँक चौकात झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीप्रमुख बंडू आंदेकरच्या सांगण्यावरून आरोपींनी कट रचून हा गुन्हा केला होता. विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. आरोपींच्या घराची झडती घेणे, त्यांनी पिस्तूल कसे मिळवले, तसेच गुन्ह्याचा कट कोठे आणि कसा रचला, याबाबत सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्याबाबतचा तपास पूर्ण झाल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपींचे घर बेकायदा म्हणून जमीनदोस्त केले असून, त्यांच्याविरोधात आठ मोक्का खटले प्रलंबित आहेत. हेही वाचा.. मोशी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये मदत जमा: सन्नी माने, राहुल गायकवाड, वामन कसबे यांच्या कुटुंबीयांना लाभ; इतरांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून वेगाने सुरू आहे. ८ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेत ९ नागरिकांचा मृत्यू झाला होता. प्रत्येक मृताच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. महापौर रवि लांडगे यांच्या निर्देशानुसार ही कार्यवाही तातडीने हाती घेण्यात आली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कागदपत्रांची पूर्तता झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. सविस्तर वाचा
Source link
आंदेकर टोळीला मोक्का अंतर्गत 5 दिवसांची पोलिस कोठडी:वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावरील हल्ल्याप्रकरणी कारवाई