Headlines

आंब्याचा रस खाल्ल्याने एकाच कुटुंबातील 7 जणांना विषबाधा:अहिल्यानगरमधील घटना, केमिकल्सने आंबे पिकवल्याचा संशय




मुंबईत गेल्या महिन्यात कलिंगड आणि बिर्याणी खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चार जणांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातूनही अशीच एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शेवगाव येथे आंब्याचा रस खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील तब्बल ७ जणांना गंभीर विषबाधा झाली आहे. हे आंबे कृत्रिमरीत्या धोकादायक केमिकल्स वापरून पिकवले असल्याचा प्राथमिक संशय डॉक्टरांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे आंबे खवैय्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर येथील जायभाय कुटुंबाने बाजारपेठेतून आंबे खरेदी करून आणले होते. रात्रीच्या जेवणामध्ये सर्वांनी आवडीने आंब्याच्या रसाचा आस्वाद घेतला. मात्र, जेवण उरकते न उरकते तोच कुटुंबातील सदस्यांना तीव्र त्रास सुरू झाला. या दुर्घटनेत कुटुंबातील मोठा भाऊ सुदैवाने वाचला, कारण तो सर्वांत शेवटी उशिरा जेवणार होता. जेवणाआधीच त्याने पाहिले की, घरातील सर्व ७ सदस्य अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले असून बेशुद्ध पडले आहेत. यात एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीचाही समावेश होता. मोठ्या भावाने अजिबात वेळ न दवडता तातडीने सर्वांना वाहनाची व्यवस्था करून जवळच्या ‘एशियन हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. डॉक्टर काय म्हणाले? जायभाय कुटुंबावर उपचार करणारे डॉ. सचिन पांडुळे यांनी रुग्णांच्या लक्षणांवरून आंबे पिकवण्यासाठी वापरण्यात आलेल्या घातक केमिकलचा अंदाज वर्तवला आहे. डॉक्टरांच्या मते, हे आंबे पिकवण्यासाठी ‘कॅल्शियम कार्बाइड’ (Calcium Carbide) या प्रतिबंधित रसायनाचा वापर केला असण्याची दाट शक्यता आहे. हे केमिकल ओलाव्याच्या संपर्कात आले की त्यातून ‘एसिटिलीन’ नावाचा अत्यंत विषारी वायू बाहेर पडतो, जो मानवी शरीरासाठी घातक असतो. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्यामुळे ७ पैकी ६ रुग्णांना प्रकृती सुधारल्यानंतर वेगवेगळ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका सदस्यावर अजूनही उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पाथर्डीत फळविक्रेत्यांवर धाडी, आंबे जप्त शेवगावमधील या धक्कादायक घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. शेजारील पाथर्डी शहरातही अशाच प्रकारे केमिकलने पिकवलेले आंबे सर्रास विकले जात असल्याची गोपनीय माहिती आरोग्य विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पंचायत समिती आणि आरोग्य विभागाने संयुक्तपणे पाथर्डी शहरात मोठी तपासणी मोहीम हाती घेतली. संशयास्पद वाटणाऱ्या अनेक मोठ्या विक्रेत्यांकडील आंब्यांचे साठे आणि नमुने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. “केमिकलने आणि विशेषतः कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या आंब्यांमुळे लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही पाथर्डीतील संशयास्पद आंब्यांचे नमुने ताब्यात घेतले असून ते तातडीने पुण्याच्या केंद्रीय प्रयोगशाळेत (Lab) तपासणीसाठी पाठवले जात आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी फळविक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आरोग्य व पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. खवैय्यांनो सावधान! आंबा खाताना ‘ही’ काळजी घ्या बाजारात सध्या आंब्याचा हंगाम जोरात आहे. मात्र, केवळ नफा कमावण्यासाठी काही बेजबाबदार व्यापारी नागरिकांच्या जिवाशी खेळत असून फळे पिकवण्यासाठी अशा घातक गॅसचा वापर करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आंबे खरेदी करताना ते अतिपिवळे किंवा रासायनिक वासाचे नाहीत ना, याची खात्री करावी. तसेच, आंबे घरी आणल्यानंतर ते किमान १ ते २ तास पाण्यात भिजवून ठेवून, स्वच्छ धुऊन आणि पूर्ण साल काढूनच खावेत, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *