Headlines

आताच्या टप्प्यात तुम्ही जरांगेंकडे का गेला नाहीत?:मराठा तरुणाचा ओमराजे निंबाळकरांना फोनवरून सवाल, ऑडिओ क्लिप व्हायरल




मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता १७ दिवस पूर्ण झाले आहेत. आंदोलनाच्या पुढील टप्प्यात १५ सप्टेंबरपासून मुंबईकडे कूच करण्याची घोषणा जरांगेंनी केली असून, १९ सप्टेंबरला मुंबईत पोहोचून आंदोलन करण्याचा त्यांचा निर्धार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनाही समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, एका मराठा तरुणाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना थेट फोन करून जाब विचारल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ओमराजे आणि मराठा तरुणाचे व्हायरल संभाषण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या कथित ऑडिओ क्लिपमध्ये एक तरुण ओमराजे निंबाळकर यांना विचारत आहे की, मनोजदादांचे उपोषण सुरू असताना तुम्ही त्यांना सपोर्ट का करत नाही? तुम्ही तिथे का गेला नाहीत? यावर उत्तर देताना ओमराजेंनी विचारले की, मी यापूर्वी ११ वेळा जरांगेंना भेटून आलो आहे, ते तुम्हाला दिसले नाही का? मात्र तरुण तिथेच न थांबता म्हणाला की, सध्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात तुम्ही गेला नाहीत. जेव्हा ओमराजेंनी आमदार कैलास पाटील जाऊन आल्याचे सांगितले, तेव्हा तरुणाने राजकीय पक्षांच्या गटांचा संदर्भ देत, आम्ही मराठा समाज म्हणून तुम्हाला मतदान करतो, हे चुकीचे आहे, अशा शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. संबंधित क्लिपची स्वतंत्र पुष्टी झालेली नसल्याने संभाषणातील दावे सत्य असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही. शाहू महाराजांचा जाहीर पाठिंबा एकीकडे राजकीय नेत्यांना मराठा तरुणांच्या प्रश्नांचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती यांनी प्रसिद्धीपत्रक काढून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. राज्य सरकार जरांगे पाटील यांना वेळोवेळी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या या चालढकल करण्याच्या भूमिकेमुळेच आज जरांगे यांच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ ओढवली आहे, अशी सडकून टीका शाहू महाराजांनी केली आहे. तसेच, संपूर्ण कोल्हापूरचा सकल मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ———- हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस: सलाइन, पाणी-उपचार सोडले, आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज; आज दुपारी करणार मोठी घोषणा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या अर्जाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली. या नकारानंतर जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. काल मध्यरात्रीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस असून, दुपारी ते माध्यमांशी संवाद साधून मोठी घोषणा करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *