Headlines

आधी तुमच्याच खात्यातली घाण साफ करा:आमदार अभिजीत पाटलांचा तुकाराम मुंढेंना सल्ला; FDAच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप




अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धुरा हाती घेतल्यापासून धडाकेबाज कारवाया सत्र सुरू करणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेतून त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, याच वेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना थेट आरसा दाखवत अन्न व औषध प्रशासन विभागात भ्रष्टाचार सुरू असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. “मुंढेंनी बाहेर धाडी टाकण्यापेक्षा आधी स्वतःच्या खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करून विभाग स्वच्छ करावा,” असा सल्ला पाटील यांनी दिला आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आणि गुटखा तस्करांना पाठीशी घालण्याचे गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यरत असलेले प्रशांत कुचेकर आणि इलागे हे औषध प्रशासनातील दोन अधिकारी चक्क गुटख्याचे रॅकेट चालवतात. कुचेकर सोलापूरमध्ये असताना त्यांच्यावर गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल झाला होता. तर अधिकारी इलागे यांच्या स्वतःच्या गाडीत तब्बल ३ कोटी ४२ लाखांची रोख रक्कम सापडली होती. हे अत्यंत गंभीर आहे.” आमदार पाटील यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “या दोन्ही अधिकाऱ्यांचा काळा कारभार मी स्वतः विधिमंडळ सभागृहात मांडला होता. सर्व पुरावे देऊनही सरकारने या दोघांवर केवळ ‘शिस्तभंगाची’ किरकोळ कारवाई केली, याचे मला दुःख वाटते. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना खात्यातून थेट बडतर्फ करण्याची गरज होती, तरच हा विभाग स्वच्छ होईल.” धाड पडण्यापूर्वीच अधिकारी तस्करांना फोन करतात अन्न आणि औषध प्रशासन विभागाची यंत्रणा आतून कशी पोखरली गेली आहे, याचे दाखले देताना आमदार पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात ‘अशोक गुप्ता’ नावाचा व्यक्ती गुटख्याचे मोठे रॅकेट चालवतो. मुंढे यांच्या विभागाचे पथक कुठेही धाड टाकण्यासाठी निघण्यापूर्वीच, विभागातील काही अंतर्गत अधिकारी या गुटखा तस्करांना फोन करून आधीच माहिती पुरवतात. यामुळे कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर माल केवळ लाखो रुपयांचा दाखवून उरलेला माल गायब केला जातो. हा सगळा प्रकार कसा चालतो, याची बित्तमबातमी आपण स्वतः तुकाराम मुंढे यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातली असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, मुंढे यांच्या नावाच्या धास्तीमुळे बाजारात १०० रुपयांना १० मिळणाऱ्या गुटख्याच्या पुड्या आता १०० रुपयात ३ मिळतायत, असा टोलाही त्यांनी लगावला. ‘ऑपरेशन तुतारी’ आणि विश्वास नांगरे पाटलांवर भाष्य यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार अभिजीत पाटील यांनी इतर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरही आपली रोकठोक भूमिका मांडली. महाविकास आघाडीच्या बैठकीला आपण गैरहजर असल्याच्या अफवांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. “मी उद्धव ठाकरे यांच्या स्नेहभोजनाला उपस्थित होतो. शरद पवार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या पक्षातून एकही आमदार फुटणार नाही किंवा कुठेही जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्वास नांगरे पाटलांवर टीका आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवर आमदारांनी आक्षेप घेतला. “प्रशासकीय अधिकाऱ्याचा कोणताही राजकीय किंवा सामाजिक पक्ष नसतो. त्यांनी सेवेत येताना घेतलेल्या शपथेचे स्मरण ठेवून नेहमी निपक्षपाती राहिले पाहिजे. कोणत्याही एका विचारसरणीची बाजू घेणे अधिकाऱ्याला शोभत नाही,” अशा शब्दांत त्यांनी सुनावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *