Headlines

आपल्याच आमदार-खासदारांना भेटायचं नाही ही जुनीच पद्धत:उदय सामंतांनी ठाकरे गटातील संवादाच्या अभावावर ठेवलं बोट!




शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीच्या चर्चांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. पक्षात कोणाशी संपर्क ठेवायचा नाही, संवाद साधायचा नाही आणि आपल्याच आमदार-खासदारांना भेटायचे नाही, अशीच परिस्थिती यापूर्वीही निर्माण झाली होती, अशा शब्दांत सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नांदेड येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ठाकरे गटातील संवादाच्या अभावाकडे बोट दाखवले. ठाकरे गटातील खासदारांच्या कथित बंडाबाबत विचारले असता, उदय सामंत यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. ते म्हणाले की, सध्या तरी कोणतेही बंड अधिकृतपणे झालेले नाही. ते ना दूरचित्रवाणी वाहिन्यांवर दिसले आहे, ना सोशल मीडियावर समोर आले आहे. त्यामुळे थेट बंड झाले आहे, असे म्हणणे सध्यातरी योग्य ठरणार नाही. भविष्यात काय राजकीय घडामोडी होतील, हा पूर्णपणे भविष्यातील विषय आहे, त्यामुळे त्यावर आताच भाष्य करणे मी टाळेल. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर टीका बंडाच्या थेट चर्चांवर सावध बोलणाऱ्या सामंत यांनी, ठाकरे गटातील अंतर्गत नाराजीच्या मुख्य कारणावर मात्र थेट बोट ठेवले. लोकप्रतिनिधींना पक्षात मिळणाऱ्या वागणुकीवर आक्षेप घेत ते म्हणाले, आमदार असो वा खासदार, पक्षातील लोकांशी संपर्क न ठेवणे आणि संवाद न साधणे ही जुनीच पद्धत आहे. नेमकी अशीच परिस्थिती यापूर्वीही निर्माण झाली होती. त्यांच्या या विधानाचा रोख थेट उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीकडे असल्याचे स्पष्ट दिसून आले. 2022 मध्येही नेत्यांनी केली होती हीच तक्रार उदय सामंत यांच्या या विधानामुळे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक बंडाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. त्या वेळीही बंडात सामील झालेल्या बहुतांश आमदार आणि खासदारांनी पक्षाच्या मुख्य नेत्यांशी संवाद होत नाही आणि पक्षप्रमुख भेटत नाहीत हीच मुख्य तक्रार केली होती. उदय सामंत हे स्वतः त्या बंडातील अत्यंत महत्त्वाचे नेते होते. त्यामुळे अशी परिस्थिती आधीही होती” या त्यांच्या विधानाला सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, ठाकरे गटात पुन्हा एकदा तसाच असंतोष धुमसत असल्याच्या चर्चांना बळ मिळाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *